आता एकच कंट्रोल रुम!

0

पुणे । स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट सिटीच्या कामाकाजासाठी नेमण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) कंपनीकडून शहरात वायफाय आणि स्मार्ट एलिमेंट प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी कंपनीने उभारलेल्या कमांड आणि कंट्रोल सेंटरला पोलिस नियंत्रण कक्ष आणि महापालिकेने वेगवेगळ्या विभागांसाठी उभारलेले नियंत्रण कक्ष संलग्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात एकच कंट्रोल सेंटर राहणार आहे. त्यासाठी कंपनीकडून शहर पोलिस आयुक्तालय आणि महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले असून त्याबाबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. शहराशी संबधीत शासकीय यंत्रणाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास विभागांतर्गत माहितीची देवाण-घेवाण आणि आपतकालीन स्थितीत एकाच ठिकाणाहून नियंत्रण ठेवण्यास तसेच उपाय योजना करण्यास मदत होणार आहे.

माहिती देवाण-घेवाण सहज शक्य
शहरात पोलीस यंत्रणा, महापालिका तसेच पीएमपीकडून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या नियंत्रणकक्षांमध्ये आवश्यक असलेल्या माहितीची नोंद ठेवली जाते. मात्र, नागरिकांच्या सुरक्षा तसेच त्यांना सुविधा देण्यासाठी काम करणार्‍या या यंत्रणाची माहिती कोणत्याही एका व्यासपीठावर नाही. पोलिसांकडून सध्या शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. तर पीएमपीकडून बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या शिवाय, महापालिकेचेही काही स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहेत. त्यामुळे हे सर्व नियंत्रण कक्ष एकाच व्यासपीठावर आल्यास या सर्व विभागांना माहितीची देवाण घेवाण सहज करणे शक्य होणार आहे.

डिजीटल यंत्रणेचे नियंत्रण
भविष्यात या नियंत्रणकक्षाला पाटबंधारे विभागाचा पूर नियंत्रण कक्ष, महावितरण तसेच जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कक्षही जोडले जाणार आहेत. अशा प्रकारे हे सर्व नियंत्रण कक्ष जोडण्यासाठीची यंत्रणा स्मार्ट सिटीकडे तयार असून त्यावर सध्या केवळ शहराचे हवामान, मोफत वाय-फाय, सामाजिक संदेश देणारे डीजीटल डिस्प्ले यंत्रणेचे नियंत्रण केले जात आहे. मात्र, या सर्व विभागांची माहिती एकत्र झाल्यास संपूर्ण शहरासाठी हे एकच कमांड आणि कंट्रोल सेंटर उपयुक्त ठरणार आहे.