आता ‘एव्हरग्रीन रेव्होल्युशन‘!

0

गुवाहाटी : आता देशात ग्रीन रेव्होल्युशन (हरितक्रांती)च नाही तर एव्हरग्रीन रेव्होल्युशन होईल. देश विकासाच्या मार्गावर हळूहळू पुढे जात असून, 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणारच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील सर्वात मोठ्या पुलाचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्याहस्ते तीनसुकिया येथे झाले. ब्रम्हपुत्रा नदीवर हा विशाल पुल बांधण्यात आलेला आहे. यावेळी मोदी बोलत होते. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त आणि या पुलाचे राष्ट्रार्पण, असा दुहेरी संगम पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्यानिमित्ताने साधला होता. या पुलाला ज्येष्ठ गायक व संगीतकार भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात आले आहे.

दोन राज्यांतील अंतर 165 किलोमीटरने कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लूक ईस्ट पॉलिसीअंतर्गत आसाम राज्याला केंद्र सरकार दक्षिण-पूर्व आशियाचे व्यापारी केंद्र बनवू इच्छित आहे. या भागाच्या विकासासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. रेल्वे, रस्ते, वीज यासारख्या प्रमुख सुविधा या भागाला उपलब्ध करून दिल्या जातील. नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या भागात पर्यटन, जल परिवहन वाढविले जाईल, असेही मोदींनी सांगितले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांतील अंतर 165 किलोमीटरने कमी होणार असून, व्यापाराला उत्तेजना मिळेल. त्यामुळे आर्थिक समृद्धी येईल. दोन्ही राज्यांतील नागरिकांच्या इंधनात प्रतिदिवस 10 लाख रुपयांची बचत होईल. यावेळी मोदींनी भाजपच्या सोनोवाल सरकारच्या कामाचेही कौतुक केले. तब्बल 2056 कोटी रुपये खर्चून बनविलेल्या या पुलाची पाहणीदेखील मोदींनी याप्रसंगी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल बनवरीलाल पुरोहित, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची याप्रसंगी उपस्थिती होती.