नवी दिल्ली: आता कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधीचा (पिएफ) लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत नुकतेच कंपनी किंवा संस्थेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि अन्य सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणं मिळायला हवा, असे म्हटले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या कलम २ एफनुसार, संस्थांसाठी काम करणारे सर्वच, मग ते कायमस्वरुपी असो किंवा कंत्राटी तत्वावर असो, ते सर्वच कर्मचारी या व्याख्येत मोडतात, असेही कोर्टाने म्हटले आहे.
पवन हंस लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिले आहेत. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पीएफ योजनेत सहभागी करून घेण्याचे आदेश कोर्टानं पवन हंस लिमिटेडला दिले आहेत. इतकंच नाही तर, कोर्टानं जानेवारी २०१७ पासून कर्मचाऱ्यांना अन्य सर्व लाभ देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद केलं आहे.
जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत थकबाकी असलेल्या पीएफवर १२ टक्के व्याजही कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे आदेश न्या. यू. यू. लळित आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं पवन हंस लिमिटेडला दिले. दरम्यान, कामगार कायदा हा कोणत्याही प्रकारच्या स्थायी किंवा अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव करत नाही, असं माजी कामगार सचिव शंकर अग्रवाल यांनी सांगितलं.