औरंगाबाद : शिवसेना व शेतकरी एकत्र आल्यामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला आहे. कर्जमाफीला फॅशन म्हणणार्यांकडून आम्ही कर्जमाफी करवून घेतली. कर्जमुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होते. कुठल्या गावातील कुठल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा फायदा झाला, यावर शिवसेना बारीक लक्ष ठेवून राहील. शेतकर्यांची कुठेही फसवणूक होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. म्हणूनच कर्जमाफीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासगट स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
40 लाख शेतकर्यांची यादी द्या
कर्जमाफी जाहीर करताना 30 जून 2016 पर्यंत ज्या शेतकर्यांची कर्ज थकली होती, त्यांना लाभ मिळणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, ही मर्यादा जून 2017 पर्यंत वाढवण्यात यावी. कर्जमुक्तीच्या निर्णयाचा नेमका लाभ किती शेतकर्यांना झाला, सरकारच्या दाव्यानुसार 40 लाख लाभार्थी शेतकर्यांची यादी सरकारने जाहीर करावी. नियमितपणे कर्ज फेडणार्या शेतकर्यांना दिल्या जाणार्या सवलतीत वाढ केली जावी. पुणतांब्यातील ज्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्यावेत, अशा मागण्याही ठाकरे यांनी केल्या.
अभ्यासगटाची स्थापना करा
शेतकर्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर मी समाधानी आहे. पण नगर आणि नाशिकमधील शेतकरी अजूनही नाराज आहेत. कर्जमाफीनंतर सरकारने शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक अभ्यासगट नेमावा. यामध्ये मंत्र्यांचादेखील समावेश असावा आणि हा अभ्यासगट फक्त गृहपाठ करणारा नसावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकर्यांचा अपमान कराल तर चपलेने मारू!
शेतकर्यांचा जर कोणी अपमान करत असेल, तर पायातील चप्पल काढून मारू, शेतकर्यांवर अन्याय करणार्यांना जागेवर ठेवणार नाही. आम्हाला सत्तेची नव्हे, तर लोकांची पर्वा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे यांनी पुणतांबे (ता. राहता) येथे भेट देऊन शेतकर्यांचा सत्कार केला.