नवी दिल्ली – कोरोनाच्या युद्धात भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी एक पेपर-आधारित चाचणी पट्टी तयार केली असून, ती अवघ्या काही मिनिटांत कोरोनाचे निदान करणार आहे. या टेस्ट किटला ‘फेलुदा’ असे नाव देण्यात आले आहे. औद्योगिक संशोधन परिषदशी (सीएसआयआर) संबंधित असलेल्या दिल्लीतल्या जेनोमिक्स अँड एम्बेडेड बायोलॉजी (आयजीआयबी)च्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले हे पेपर स्ट्रिप आधारित चाचणी किट आहे.
आयजीआयबीचे वैज्ञानिक डॉ. सौविक मॅटी आणि डॉ. देबाज्योती चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पेपर स्ट्रिप आधारित चाचणी किट विकसित केली आहे. हे किट एका तासापेक्षा कमी वेळात नवीन कोरोना विषाणूचे (एसएआरएस-सीओव्ही -२) व्हायरल आरएनए शोधू शकते. वैज्ञानिक सांगतात की, पेपर स्ट्रिप किट सामान्यत: वापरल्या जाणार्या चाचणी पद्धतींपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि एकदा ते विकसित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे आव्हान पूर्ण करता येण्यास मदत होणार आहे. देबज्योती चक्रवर्ती म्हणाले, सध्या या चाचणी किटची वैधता तपासली जात आहे, ती पूर्ण झाल्यानंतर नवीन कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. हे किट सुरू झाल्यामुळे व्हायरस तपासणीसाठी वापरल्या जाणार्या महागड्या रिअल टाईम पीसीआर मशीनची आवश्यकता भासणार नाही. नवीन किटचा वापर करून चाचणीची किंमत सुमारे ५०० रुपयांवर येऊ शकते.