आता कूटनीतीचाच आधार!

0

पाकिस्तानी सैन्याचे अस्तित्वच भारतविरोधावर टिकून आहे. तेथील राजकारण्यांनी, सैन्याधिकार्‍यांनी भारताविरोधात विष ओकले नाही, तर त्यांना स्वतःची अस्तित्वहीनता भेडसावते. भारतीय नागरिक व नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाने पाकी लष्कराचा हा भारतद्वेष पुन्हा एकदा दिसून आला. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांचे संबंध कधीही चांगल्या शेजार्‍यांसारखे नव्हते. भविष्यातही ते चांगले होतील, अशी खात्री देता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भलेही पाकचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या घरी जाऊन त्यांची गळाभेट घेतली, तरी या दोन देशांत कौटुंबिक संबंध निर्माण होऊ शकले नाहीत. केवळ द्वेषाच्या पायावरच या देशाची निर्मिती झाल्याने भविष्यातही अशा चांगल्या संबंधाची पाकिस्तानकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल. शत्रुत्व निभावण्याचे सर्व मार्ग हा देश, तेथील लष्कर वापरत असून, भारताच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. पाकिस्तानी सीमेवरून घुसखोरी थांबता थांबत नाही. शस्त्रसंधी कराराचे वारंवार उल्लंघन होतच आहे. काश्मीर खोर्‍यात भारतविरोधी भावना भडकवण्याचे काम सुरूच आहे. त्यासाठी तेथील तरुणांना हाताशी धरून भारतीय लष्करावर पैसे देऊन दगडफेक करवून घेतली जात आहे. आता वैध भारतीय पासपोर्ट असताना कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकाला कायदा पायदळी तुडवून फासावर लटकवण्यासाठी पाकिस्तान उतावीळ झालेला आहे. खरे तर जाधव यांचे इराणमधून अपहरण करून पाकिस्तानी लष्कराने त्यांना हेर ठरवण्यासाठी जीवाचा आटापिटा चालवला असून, त्यात त्यांना कायदेशीर पुरावे जमा करण्यात पुरते अपयश आलेले आहे. परंतु, त्यांना वाचवण्यासाठी सरकारने वाट्टेल ते करावे व त्यांचा जीव वाचवावा, अशी आमची प्रखर इच्छा आहे.

कुलभूषण यांचा जीव वाचवून त्यांना सुखरूप भारतात परत आणण्यातच मोदी यांची कसोटी असून, या कसोटीत मोदी उत्तीर्ण होतात की अनुत्तीर्ण हे लवकरच कळेल! वास्तविक पाहता, कुलभूषण हे नौदलातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कमांडर असून, त्यानंतर त्यांनी इराणमध्ये काही व्यवसाय सुरू केला होता. परंतु, गुप्तहेर म्हणून त्यांचे अपहरण करत त्यांना फासावर लटकवण्याची पाकिस्तानी लष्कराला झालेली घाई ही त्यांना आपली मर्दुमकी दाखवण्याची संधी वाटत आहे. खरे तर, पाकिस्तान हा जगातील एकमेव असा गाढव देश आहे, जो हेरगिरी आणि देशद्रोहाचा खटला नागरी न्यायालयात न चालवता लष्करी न्यायालयात चालवत आहे. लष्करी न्यायालयाचे काम हे लष्करी खटले चालवणे असते, नागरी खटले चालवणे नाही. भारताने अजमल कसाबविरुद्धचा देशद्रोह व भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा खटला नागरी न्यायालयात चालवला. त्याला बचावाची पुरेपूर संधी दिली. हा खटला लष्करी न्यायालयात चालवण्याचा मूर्खपणा भारताने केला नव्हता. परंतु, ही बाब पाकड्यांना कोण समजावून सांगेल? तूर्त तरी तेथील लष्करी फिल्ड जनरल कोर्ट मार्शल न्यायालयाने दहशतवाद आणि हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. त्यावर पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनीही शिक्कामोर्तब केलेले आहे. पाकिस्तानात लोकशाही अत्यंत कमकुवत असून, राजकीय नेते व सत्ताधारी लष्कराच्या तालावर नाचत असतात. लष्कराच्या रक्तात केवळ भारतद्वेषच भिनलेला असल्याने त्यातूनच कुलभूषण यांना फासावर लटकवण्यासाठी ते उतावीळ दिसते. पाकिस्तानातील मूलभूत समस्यांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी तेथील लष्कर अन् सत्ताधारी यांना ही आयती संधीच मिळालेली आहे. कुलभूषण यांच्या फाशीवरून भारतानेदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘आऊट ऑफ वे‘ जाऊन कुलभूषण यांना वाचवू, असे आश्‍वासन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेला दिलेले आहे. परंतु, पाकिस्ताननेदेखील त्यावर आपली युद्ध खुमखुमी दाखवून सद्या तरी भारताला वेठीस धरलेले दिसते.

कुलभूषण यांच्या बदल्यात त्यांना नेमके काय हवे? याच्या वाटाघाटी नजीकच्या काळात घडताना दिसतील. पाकिस्तानचे अनेक कैदी, हेर सध्या भारताच्या कारागृहांत बंद आहेत. मागील काही दिवसांत नेपाळमधून एक पाकिस्तानी सैन्य अधिकारीही अचानक गायब झाल्याचे वृत्त आले होतेे. बोलल्या जात आहे की, हा अधिकारी भारताच्या ताब्यात असावा. या अधिकार्‍याला परत घेण्यासाठीच कुलभूषण यांना फाशीची शिक्षा व या शिक्षेच्या अंमलबजावणीला 40 दिवसांचा वेळ पाकिस्तानने दिलेला आहे. कुलभूषण जिवंत आहेत किंवा नाही, हेदेखील भारताला माहीत नाही. कारण भारतीय उच्चायुक्तांनी विनंती करूनही पाकिस्तानी लष्कराने त्यांना भेटू दिले नाही. स्वराज यांनी दिलेला इशारा पाकिस्तान नक्कीच गांभीर्याने घेईल. कारण त्यांना माहीत आहे, भारतात आता कडवट हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे, अजित डोवालसारखे सुरक्षा सल्लागार आहेत. त्यामुळे काही झाले तरी कुलभूषणला नक्कीच वाचवता येईल, असा विश्‍वास बाळगू या!