आता ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा घेणार भारतीय पोशाख

0

पोशाख बदलण्याचा निर्णय; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 11 जानेवारीला पदवीप्रदान कार्यक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ची जागा नवा पोशाख घेणार आहे. विद्याापीठ प्रशासनाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी वर्षानुवर्षे असलेला हा पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला असून, 11 जानेवारीला होणार्‍या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी कुडता, पायजमा आणि उपरणे असा भारतीय पोशाख असेल. भारतातून 70 वर्षांपूर्वी ब्रिटिश गेले. मात्र, त्यानंतरही पदवीप्रदानाला घोळदार गाऊन आणि टोपी घालण्याची ब्रिटिशांची परंपरा पुढेही सुरूच राहिली. आजही बहुतांश विद्यापीठांमध्ये घोळदार गाऊन आणि टोपी हाच पोशाख असतो.

ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज

काही महिन्यांपूर्वी भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी ही ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज व्यक्त केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही त्याबाबत विचाराधीन होते. अखेरीस विद्यापीठाने पदवीप्रदान कार्यक्रमासाठी पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला.

प्रशासन व विद्यार्थी सर्वांसाठी हाच पोशाख

अनेक वर्षांपासून असलेला काळा गाऊन अडचणीचा ठरत होता. त्यामुळे विद्याापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठीचा पोशाख भारतीय संस्कृतीला साजेसा असावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुडता, पायजमा आणि उपरणे असा पोशाख ठरवण्यात आला आहे. सोबत पगडीही असेल. विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी अशा सर्वांसाठी हाच पोशाख असेल. 11 जानेवारीला होणार्‍या पदवीप्रदान कार्यक्रमापासून हा बदल अमलात येईल.

या पूर्वीही केला होता बदल

विद्यापीठाने या पूर्वीही पदवीप्रदान पोशाखात बदल केला होता. डॉ. राम ताकवले कुलगुरू असताना 1981-82 च्या सुमारास हा बदल करण्यात आला होता. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे पदवीप्रदान व्हावे, असे सुचवले होते. हा बदल करण्यासाठी संस्कृततज्ज्ञ डॉ. रा. ना. दांडेकर यांची समिती नेमली होती. त्यानुसार उपरणे हे पांडित्य आणि शौर्याचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोशाखात उपरणे समाविष्ट करण्यात आले, तर उपदेश संस्कृतमध्ये देण्यात येऊ लागला. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले विद्याापीठ गीत संगीतकार डॉ. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केले होते. काही काळानंतर गाऊन पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली, अशी आठवण डॉ. ताकवले यांनी सांगितली.