आता कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रीप्शनची गरज नाही; केंद्राचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतातील कोरोना चाचणीचे प्रमाण देखील मोठे आहे. चाचण्या वाढल्यामुळेच रुग्ण संख्या देखील वाढली आहे. दरम्यान आता केंद्र सरकारने करोना चाचणीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. अगोदर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय करोना चाचणी करून घेता येत नव्हती. मात्र, आता जर कुणाला करोना टेस्टिंग करून घ्यायची असेल, तर यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनची गरज लागणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ टेस्टिंग संदर्भातील अॅडव्हाझरीमध्ये काही बदल केले आहेत. ज्यानुसार लोकांना ऑन-डिमांड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आता डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय कोविड-१९ टेस्ट करता येणार आहे. याशिवाय असे व्यक्ती जे प्रवास करत आहेत आणि आपली टेस्ट करून घेऊ इच्छित आहेत. ते देखील ऑन-डिमांड कोविड -१९ टेस्ट करून घेऊ शकतात.

या निर्णयानंतर जर एखाद्या व्यक्तीत करोनाची लक्षणं आढळत असतील, तर त्याला हवं असेल तर कोविड चाचणी करून घेऊ शकतो. याचबरोबर ज्यांनी मागील १४ दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. त्यांच्यातील लक्षणं असणाऱ्या व्यतिरिक्त देखील सर्व लोकांची चाचणी केली जाईल. एखाद्या दुसऱ्या राज्याचा किंवा देशाचा प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड -१९ निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरोग्य विभागाद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.