नागपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत कसा हरला त्याची चौकशी करावी, अशी अजब मागणीही आठवले यांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या माध्यमातून त्यांनी एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे.
फिक्सींगचा आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज मात केली होती. असे असताना अत्यंत बलवान असणारा भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाक संघाकडून पराभूत कसा होऊ शकतो?, असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला आहे. विशेष बाब म्हणजे आधीच पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आमिर सोहलनेही पाकिस्तानचा संघ फिक्सींग करून अंतिम फेरीत पोहोचल्याचा आरोप केला होता. कर्णधार सरफराज अहमद याच्यावरही त्याने आरोप केला होता.
पुन्हा उचलला मुद्दा
आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा क्रिकेटमधील आरक्षणाची मागणी केली आहे.. क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीला 25 टक्के आरक्षण द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी आधीदेखील हा मुद्दा उचलला होता. मात्र अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमिवर आठवले यांनी केलेली मागणी नव्या वादाला तोंड फोडणारी ठरू शकते.
‘गोवंश’मधून वंश काढा
दरम्यान नागपूर येथील कार्यक्रमात आठवले यांनी अन्य विषयांनाही हात घातला. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे, आता या सरकारने स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घ्यावा असे रामदास आठवले यांनी सांगितले. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याशी यासंदर्भात मी बोलणार, शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर मागासवर्गीय महामंडळातील कर्ज माफ करावे, गोवंश हत्यातून वंश शब्द काढावा असे त्यांनी म्हटले.
दहा वर्षे मोदींसोबत !
दरम्यान, कार्यक्रमात रामदास आठवले म्हणाले की, ‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो, त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. आता मी पुढील 10 वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाहीत. त्यानंतर हवा ज्या दिशेला वाहणार, तिकडे आम्ही जाणार! हवेची दिशा जाणून प्रवास केल्यासच राजकारणात टिकाव लागतो’ अर्थात उपस्थितांनी आठवले यांना जोरदार दाद दिली.