राज्यभर मुख्यमंत्री चषक स्पर्धेतंर्गत आयुष्यमान क्रिकेट ते स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा
मुंबईः भाजपने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत जोरदार तयारी सुरू केलीय. जाहिरातबाजी, कॅम्पेनिंग यामध्ये आघाडीवर असलेल्या भाजपने बाकीच्या सर्व पक्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित केले आहे. भाजपच्या युवा मोर्चाकडून थेट 50 लाख तरूण मतदारांशी संपर्क करण्यासाठी आणि शासकिय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री चषक स्पर्धेतंर्गत शासकीय योजनांच्या नावावर आधारीत आयुष्यमान क्रिकेट ते स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले. ही स्पर्धा राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात खेळली जाणार असून ही स्पर्धा 75 दिवस चालणार आहे.
मुख्यमंत्री चषक स्पर्धे अंतर्गत राज्यातील 50 तरूण मतदारांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट भाजपकडून ठरविण्यात आले आहे. या स्पर्धेतंर्गत 10 विविध प्रकारच्या अर्थात आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान अँथलेटीक्स, मुद्रा योजना बुध्दीबळ, स्वच्छ भारत कुस्ती, कौशल्य भारत कँरम आदी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत उज्ज्वला नृत्य स्पर्धा, जन-धन एकांकिका स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा, ग्रामज्योती काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला 31 ऑक्टोबर रोजी 4 वर्षे पूर्ण होत आहे. तर 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे महत्व लक्षात घेवून 30 ऑक्टोबर पासून या स्पर्धेस सुरुवात होवून 12 जानेवारीला त्याचा समारोप करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने दिली. या स्पर्धेतील 8 हजार 640 विजेत्यांना मतदारसंघ निहाय विजेता म्हणून घोषित करून त्यांना बक्षिस देण्यात येणार आहे. तर 1 हजार 80 जिल्हानिहाय विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शेवटी 30 संघांची राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून जवळपास 1 कोटी रूपयांचा खर्च या स्पर्धेवर खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.