आता खेळाडूंच्या ‘बॅट’वर निर्बंध!

0

नवी दिल्ली : टी२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी कसोटी प्रकारात एकही चौकार न मारता दिवसभराचा खेळ संपेपर्यंत मैदानावर टिकून राहणाऱ्या खेळाडूची बरीच प्रशंसा केली जात होती. टी २० मध्ये पहिल्या पाच मिनिटांत मोठा शॉट मारला नाही, तर त्याच खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. टी २० क्रिकेट सामन्यांची वाढती लोकप्रियता पाहता आता लवकरच खेळाडूंच्या फलंदाजीमध्ये काही बदल होण्याची चिन्ह आहेत. फलंदाजांची फटकेबाजी आणि बॅटच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय सर्जनने फलंदाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटच्या निर्मिती आणि डिझाईनमध्ये काही आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली आहे.

गोलंदाजांना मिळणार दिलासा
२० ट्वेंटी क्रिकेट प्रकार म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळच. तुफान फटकेबाजी हे एकमेव विशेषण असलेला हा खेळ बॅटच्या ताकतीच्या बळावरच खेळला जातो की काय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. फलंदाजीमध्ये होणारी फटकेबाजी पाहता काही दिग्गज गोलंदाजांनी या सर्व परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली. त्यांच्या मते, सामन्यांमध्ये गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही त्यांच्या खेळाचे सादरीकरण करण्याची योग्य संधी मिळाली पाहिजे. अस्थिरोग तज्ज्ञ चिन्मय गुप्ते लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील क्रिकेट संघाच्या साह्याने या प्रकल्पावर काम करत आहेत. गुप्ते यांच्या मते, गेल्या ३० वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये चौकार- षटकारांचं प्रमाण वाढण्यामागचं मुख्य कारण आहे बॅट बनवण्याची प्रक्रिया. ज्यामुळे सध्या गोलंदाजांवर दबाव असल्याचंही पाहायला मिळत आहे.

नव्या डिझाईनचा शोध
भारतीय वंशाचे आॅर्थोपीडिक सर्जन चिन्मय गुप्ते यांनी बॅटच्या नव्या डिझाईनचा शोध लावला आहे. या वर्षी १ आॅक्टोबरपासून या बॅटचा वापर केला जाईल. क्रिकेट बॅटवर संशोधन करणाऱ्या लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या चमूचे नेतृत्व चिन्मय गुप्ते यांनी केले. मेरिलबोन क्रिकेट क्लब या नव्या डिझाईनच्या बॅटचा वापर करणार आहे. गुप्ते यांनी सांगितले की, ‘‘ गेल्या ३० वर्षांत क्रिकेटमध्ये षटकारांची संख्या वाढली आहे. बॅटचा आकार असा आहे, की बॉलऐवजी बॅटचा दबदबा राहील. हे नवीन डिझाईन संतुलन आणेल. नवीन नियमानुसार बॅटच्या कोपऱ्यांची जाडी ४० मिलिमीटर तर मध्यभागाची जाडी ६७ मिलिमीटरपेक्षा जास्त नको. गुप्ते हे महाराष्ट्राचे क्रिकेटपटू मधुकर शंकर गुप्ते यांचे पुत्र आहे. तसेच ते मिडलसेक्स आणि ग्लुसेस्टरसाठीदेखील खेळले आहेत.