चाळीसगाव । तालुक्यातील बिबट्याने तब्बल पाच जणांचा बळी घेतल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मयत सुसाबाई धना नाईक (55) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी 11 वाजता चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या आणल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार उन्मेश पाटील यांनी वनविभागाचे राज्याचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याशी तब्बल 20 मिनिटे संवाद साधत संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर खर्गे यांनी बिबट्याला ठार मारण्याचे तोंडी आदेश दिले. दरम्यान, डीएफओ साळुंखे यांची आमदारांनी धारेवर धरले. आम्हाला आता आश्वासन नको तर प्रत्यक्षात कृती हवी आहे. पाच लोकांचे बळी गेले असून तुम्ही कारवाई करत नसाल तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो व मी आमदार आहे तेव्हा विसरून जाईल, अशा शब्दात सांगितले. तर माजी आमदार राजीव देशमुख यांनी तहसिलदार यांना भरनियमनासंदर्भात विज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असतांना त्याभागातील भारनियमन का कमी होत नाही तसेच लोक शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत तालुका भयभित झाला आहे म्हणुन लवकर उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली. शासकीय विश्रामगृहात आमदारांनी राज्याचे प्रधान सचिव किसान खर्गे यांच्याशी तब्बल 20 मिनिटे इंग्रजीत संभाषण साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर खर्गे यांनी बिबट्याला ठार मारण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर आमदारांनी पोलीस ठाणे गाठून मयत सुसाबाई नाईक यांच्या नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला.
ठिय्या आंदोलन करूनही वनविभागाचे दुर्लक्ष
यापुर्वी राहूल चव्हाण, अलका अहिरे, बाळू सोनवणे, दिपाली जगताप या बिबट्याच्या हल्ल्यात बळी ठरल्या होत्यात सलग दोन महीन्यातील रविवारी झालेल्या वरखेडे येथील हल्ल्यातील बिबट्याचा हा पाचवा बळी ठरला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर भयभीत झाला असून शेतमजूर आणि पशुपालक शेतकरी वर्ग दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील बळींचे सत्र सुरु असतांना मागील वरखेडे येथील हल्ल्यातील मृत दिपाली जगताप यांचा मृतदेह गावक-यांनी तहसिलदार आवारात आणून ठेवला होता. यावेळी ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. बिबट्याला ठार करण्या संदर्भात वनविभागास सुचना देण्यात आल्या होत्यात, याबाबतीत तहसिलदार आणि वनविभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, परंतु आज 10 दिवस उलटूनही त्यावर शासनाने त्याची दखल घेतली नाही, बिबट्याच्या हल्ल्यात जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, संपूर्ण गिरणा परिसर दहशीतीखाली आहे, शासनाने आता तरी जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये असे खडे बोल यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सुनावण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, शिवसेनेचे रमेश चव्हाण, आर एल पाटील, महेंद्र पाटील, भाजपचे राजेंद्र चौधरी, दिनेश बोरसे, संजय पाटील, रविंद्र पाटील, प्रभाकर चौधरी, राष्ट्रवादीचे दिनेश पाटील, प्रमोद पाटील, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, पंचायत समितीचे अजय पाटील, शाम देशमुख, रयत सेनेचे गणेश पवार, सरपंच वरखेडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व वरखेडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिसताच क्षणी गोळी झाडण्याचे दिले आदेश
दरम्यान दुपारी 3 वाजेच्या सुमारास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी चाळीसगाव येथे येवुन प्रशासकीय बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे घेवुन बिबट्याच्या सततच्या हल्ल्याबाबत माहीती घेवुन ना महाजन यांनी भ्रमणध्वनीवर वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याला दिसेल तिथे गोळ्या घालण्याचे आदेश दिले असल्याचे सांगीतले तर हल्ल्याची चटक बिबट्याला लागली आहे. त्यावर उपाययोजना झाली पाहीजे म्हणुन 2 ते 3 जिल्ह्यातील लोक याठिकाणी बोलावुन जादा पिंजरे लावुन त्याला पकडणार व बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत भारनियमन बंद करा, अशी मागणी करून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी रात्रंदिवस गस्त घालुन दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणार असल्याचे ना.महाजन यांनी यावेळी सांगितले. तर आमदार उन्मेश पाटील यांनी सांगितले की बिबट्याच्या सततच्या हल्ल्याने व त्याभागात विजेचे भारनियमन असल्याने शेतकरी शेतमजुर घाबरले आहेत ते शेतात जात नाहीत म्हणुन त्या भागातील 10 ते 12 गावांचे भारनियमन कमी करावे, तसेच वनविभागाचे कर्मचारी एका ठिकाणी न थांबता त्यांनी फिरती गस्त ठवावी, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.