तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभेत ठराव मंजूर; नवीन समाज मंदिरे बांधणार, रस्त्याचे काँक्रीटीकरण
तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडेवासीयांना आता जलमापक (पाणी मीटर) यंत्रामार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसा ठराव तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने केला असून सर्वसाधारण सभेत तो एकमताने मंजूर केला आहे. नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेतील 118 विषयावर साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र भुजबळ हॉल येथे लायब्ररी करण्याचा ठराव स्थगित ठेवण्यात आला.
सभेस उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे, सत्तारुढ पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, संग्राम काकडे, अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे, सचिन टकले, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, विरोधी पक्षाचे गटनेते किशोर भेगडे, अरुण माने, विशाल दाभाडे, वैशाली दाभाडे यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.
जुन्या जलवाहिन्यांची होणार दुरुस्ती
शहरातील नागरिकांना नव्याने नळजोड देताना जलमापक यंत्राशिवाय जोड दिला जाणार नाही. तसेच जुन्या नळधारकांनी जलामापके (मीटर) बसविण्यास पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच शहरातील जुन्या सडलेल्या जलवाहिन्या बदलण्यास व नवीन टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली. नगर परिषदेच्या विविध विभागातील निविदांना आणि झालेल्या कामकाजाच्या बिलांना मंजुरी देण्यात आली. तर आरोग्य प्रशासनाच्या सुस्त कामाबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली.
विविध विकासकामांना मंजुरी
शहराच्या विविध भागातील समाज मंदिरातील दुरुस्ती तसेच नवीन समाज मंदिरे बांधणे, उद्यानाचे सीमाभिंत नवीन बांधणे, उद्याने दुरुस्तीच्या कामास मंजुरी देण्यात आली. दलीतवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मध्ये एलइडी दिवे बसवणे, व्यायाम शाळा बांधणे, ढोरवस्तीमध्ये रस्ता बनविणे, संभाजी नगरमध्ये अंतर्गत सिमेंटचे रस्ते बनवणे, नगरपरिषद शाळेजवळ सीमाभिंत बांधणे तसेच नालबंद गल्लीत गटारे बांधणे, दुरुस्त करणे, तळेगाव स्टेशनला जोडणार्या रस्त्याला थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील नाव देणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली.
नगरपरिषदेच्या फंडातून बुजवणार खड्डे
तळेगाव चाकण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीवरून सुलोचना आवारे यांनी कामकाज रोखून धरले. अखेर हे खड्डे बुजविण्याचे काम नगरपरिषदेच्या फंडातून करण्याचा तोडगा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितल्यावर सभेचे कामकाज पुढे चालू करण्यात आले. या सभेत रेल्वे अंडरग्राउंडब्रीज बांधण्याच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली. मारुती मंदिर चौकात चालू असलेल्या क्रीडा संकुलचा छत बसविण्यास आणि क्रीडांगण सम पातळीत करणेच्या कामास मंजुरी देण्यात आली.