आता ड्रायव्हिंग लायसन्सही ‘आधार’शी लिंक करणार!

0

नवी दिल्ली । आधारकार्ड ड्रायव्हिंग लायसन्सोबत लिंक केले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. हे कधीपर्यंत केले जाणार आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेेले नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डमुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते की नाही यावर निर्णय दिलेला नाही. त्याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्ससोबत लिंक करणे हा सरकारचा अजेंडा असला, तरी त्याची अंमलबजावणी करणे कितपत शक्य आहे हे पाहावे लागेल.

मृत्यूनंतरही आधारची सक्ती
मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधारची सक्ती करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला असेल, तर अर्जदाराला मृत्यू झालेल्या व्यक्तीचं आधार कार्ड सादर करावं लागणार आहे, नाहीतर किमान आधार क्रमांक माहिती असणं गरजेचं असणार आहे.

तीन महिन्यांची मुदतवाढ
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यसाठी सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याआधी सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देत 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलं नाही तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे नवीन पॅन कार्ड बनवावे लागू शकते. यासोबतच जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.

आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक करण्याचं प्लानिंग करत आहोत. यासंबंधी मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे, पैशांची अफरातफर रोखण्याच्या दृष्टीने पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-रविशंकर प्रसाद