मुंबई : भारतीय रेल्वेची नवी ओळख असलेल्या आणि संपूर्ण सुविधायुक्त तेजस एक्सप्रेसमध्ये आता प्रवाशांच्या दिमतीला रेल्वे हॉस्टेसची नियुक्ती होणार आहे. तेजस एक्स्प्रेसद्वारे गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानातील सेवेप्रमाणे या हॉस्टेस सेवा पुरविणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नवी दिल्ली-आग्रा गतीमान एक्स्प्रेसमध्ये हॉस्टेस तैनात केल्यानंतर रेल्वेने मुंबई-गोवा रेल्वेमार्गावर तेजस एक्सप्रेसमध्ये देखील ही सेवा सुरू करण्याचे ठरविले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, आयआरसीटीसीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तेजसमध्ये हॉस्टेस नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रवीण असलेल्या तरुणींना यासाठी करारबद्ध केले जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे तेजस मध्ये प्रवास करताना विमानप्रवासाची अनुभूती प्रवाशांना येणार आहे. यासाठी या होस्टेसना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे स्वागत गुलाबाचे फुल देऊन केले जाते. तसेच प्रवाशांना थोड्या-थोड्या अंतराळात वेगवेगळे फूड देखील पुरविले जाते. हॉस्टेसच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने सीसीटीव्ही लावले आहेत. यामुळे प्रवाशांकडून गैरवर्तना झाल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
अतिजलद गतीच्या या रेल्वे सेवेमध्ये अग्नीशमन प्रणाली, जीपीएसवर आधारीत प्रवासी माहिती मांडणी प्रणाली तसेच डिजीटल डेस्टीनेशन बोर्ड, केटरिंग सर्विसेस, अंध प्रवाशांसाठी ब्रेल सहयोग सेवा, बोर्ड इन्फोटेनमेंट, वाय-फाय, सीसीटिव्ही, अग्नी व धूम्रशोधक सुविधा, चहा-कॉफी पुरवठा करणारी वेंडींग मशिन यासारख्या उच्च दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे कोकण प्रदेशातील पर्यटन क्षेत्राला उभारी मिळणार आहे. तेजस ही ट्रेन मुंबई-गोवा दरम्यान आठवड्यातून पाच वेळा चालते. मानसूनमध्ये आठवड्यातून तीनदा चालवतात.