आता तो भारत राहिला नाही!

0

नवी दिल्ली : सिक्किममध्ये रस्ता निर्माणावरून सुरु असलेल्या वादविवादात चीनने भारताला अप्रत्यक्षरित्या युद्धाची धमकी दिल्यानंतर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही चीनला अप्रत्यक्षरित्या युद्धाची धमकी दिली आहे. 1962च्या युद्धापासून बोध घ्या, असा टोला चीनने हाणला होता. त्यावर बोलताना जेटली यांनी 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक आहे. 1962ची परिस्थिती आता राहिली नाही, अशा शब्दांत जेटली यांनी चीनला ठणकावले.

दोन देशांत लष्करी तणाव
चीनने 1962 मध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवाची आठवण करून देत चीनने भारताला अप्रत्यक्षरित्या युद्धाची धमकी दिली. भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय सेना चीन, पाकिस्तानसह अंतर्गत धोक्यांना निपटण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केला होता. लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यानंतर चीनने अशाप्रकारची आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. चीन सद्या भारतीय सीमेनजीक रस्ता निर्माण करत असून, ते काम भारतीय लष्कराने बंद पाडले आहे. तसेच, तेथे मोठ्या प्रमाणात भारतीय लष्कर तैनात झाले आहे. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला असून, भारताशी युद्ध खुमखुमी दाखविण्याचे काम चीन नेतृत्वाकडून होत आहे. नुकतेच, चीन सैन्याने भारतीय बंकर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे भारत-चीनच्या सैन्यात झडपदेखील उडाली होती. गुरुवारी लष्करप्रमुख रावत यांनीदेखील सीमेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. भारताने सिक्किममधील डोंगलोंग क्षेत्रातील आपले लष्कर परत घ्यावेत, यासाठी चीन सद्या भारतावर दबाव आणत आहे.

कैलास मानसरोवर यात्रा रद्द!
सिक्किमवरून नाथू लाच्या मार्गे कैलाश मानसरोवर जाणारी तीर्थ यात्रा रद्द करण्याचा निर्णय अखेर भारताने घेतला आहे. भारत व चीनच्या दरम्यान वादग्रस्त सीमा भागात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या भागात सद्या चीन सैनिक व भारतीय सैनिकात चकमकी उडत असून, प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. सद्या सीमेवर असलेले 400 यात्रेकरून परत पाठविण्यात आले असून, हे यात्रेकरू आता उत्तराखंडमार्गे लिपूलेख र्देच्या मार्गे कैलाश मानसरोवरला जाऊ शकतील.