आता धोनीला पर्याय शोधायलाच हवा!

0

नवी दिल्ली । स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनंही माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लक्ष्य केलं आहे. टी-20 प्रकारात धोनीला पर्याय शोधायला हवा. त्याच्या जागेवर एखाद्या तरुणाला संधी द्यायला हवी, असं मत त्यानं व्यक्त केलं आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात धोनीनं 37 चेंडूंत 49 धावा केल्या. त्यातील 26 धावा केवळ 5 चेंडूंमध्ये वसूल केल्या होत्या. त्यात 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. उर्वरित 32 चेंडूंमध्ये केवळ 23 धावा काढल्या होत्या. यामुळं टी-20 प्रकारात धोनीऐवजी दुसरा पर्याय शोधावा, या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. धोनी अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळू शकतो, पण टी-20मध्ये त्याच्या जागेवर अन्य खेळाडूला संधी द्यायला हवी, असं लक्ष्मणनंच म्हणणं आहे. धोनीनं 37 चेंडूंमध्ये 132 च्या सरासरीनं 49 धावांची खेळी केली. ही खेळी खूपच चांगली आहे. पण गेल्या वर्षभरातील त्याची धावांची सरासरी बघता हा चिंतेचा विषय आहे. लक्ष्मणनच्या या वक्तव्यानंतर आता कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री आजच्या सामन्यात धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

धोनीच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह करणार्‍यांवर भडकला भुवनेश्‍वर
वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारने महेंद्रसिंग धोनीला लेजेंड म्हटलं आहे. मालिकेतील दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले, पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्‍न निर्माण होऊ लागले. सोमवारी सराव सत्रानंतर धोनीला आता संघात ठेवावे की नाही या प्रश्‍नावर उत्तर दिलं. ’धोनीच्या फॉर्मवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांनी त्याचे रेकॉर्ड आधी पाहावे. आमच्या संघामध्ये धोनीच्या खेळाबद्दल कोणालाही काहीही शंका नाही.

टी-20 त धोनी नाही मग कोण?
1 दिल्लीचा तरुण खेळाडू ऋषभ पंत याने आपल्या प्रदर्शनामुळे सर्वाचंच लक्ष वेधलं आहे. पंतनेआतापर्यंत केवळ दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. पण आयपीएलमधील कामगिरीने त्याने सर्वांना प्रभावित केलं.
2 युवा खेळाडू संजू सॅमसनने आयपीएलमध्ये खेळातील चुणूक दाखवून दिली आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने शानदार प्रदर्शन केलं. दिग्गज खेळाडू राहुल द्रविडने त्याच्या फलंदाजीचं अनेकदा कौतुक केलं आहे. सॅमसन आतापर्यंत केवळ एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला असून, या सामन्यात त्याने 19 धावा केल्या.
3 दिनेश कार्तिकने वनडे क्रिकेटमध्ये नुकतंच धडाक्यात पुनरागमन केलं आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरपासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी खेळत आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या अगोदरपासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी खेळत आहे. त्यामुळे धोनीच्या जागी कार्तिकच्या अनुभवाचा चांगला फायदा संघाला होऊ शकतो. 10 टी-20 सामन्यात कार्तिकने 21 च्या सरासरीने आणि 126 च्या स्ट्राइक रेटने धावा ठोकल्या आहेत.
4 के. एल. राहुलने कसोटी सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी त्याने यष्टिरक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल पार्ट टाइम विकेटकीपर म्हणून चांगलं उदाहरण आहे.
5 कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची जागा घेणार्‍या रिद्धीमान साहाला अजून टी-20मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 164 टी-20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 14 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे. साहा उत्तम यष्टिरक्षक आहे तसंच खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा त्याला चांगला अनुभवही आहे.