शिवसेनेचे पालिका गटनेते राहुल कलाटेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या कर्मचार्यांना नगरसेवकांनी मारले की अशा घटना रागाच्या भरात घडले म्हणतात. आपण सुद्धा कर्मचार्यांना मारहाण करणार्या नगरसेवकांना रागाच्या भरात व्हरांड्यात चांगले चोपून काढले पाहिजे, अशा तीव्र भावना महापालिकेच्या कर्मचार्यांनी गुरूवारी (दि. 14) व्यक्त केल्या. तसेच राहुल कलाटे यांनी स्वतःच्या कामासाठी एका अभियंत्याला मारहाण केल्याने त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी काही कर्मचार्यांनी केली.
अभियंता मारहाण प्रकरण तापले
शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी टीडीआरच्या फाईलवर सही न केल्याच्या कारणावरून अभियंता अनिल राऊत यांना 11 फेब्रुवारी रोजी शिवीगाळ आणि मारहाण केली होती. याप्रकरणी अभियंता राऊत यांनी 13 फेब्रुवारी रोजी तक्रार केल्यानंतर पिंपरी पोलिस ठाण्यात कलाटे आणि त्यांचे साथीदार विनोद मोरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाटे यांनी अभियंता राऊत यांना मारहाण केल्याच्या प्रकाराचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने शुक्रवारी (दि. 14) कर्मचार्यांची सभा घेऊन निषेध केला.
मारहाणीबाबत संताप
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत अनेक कर्मचार्यांनी आपल्या तीव्र भावना आणि नगरसेवकांकडून होणार्या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला. आता थेट नगरसेवकांनाच मारहाण करू, अशा शब्दांत कर्मचार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल कलाटे यांनी अभियंता अनिल राऊत यांना सांगितलेले काम नागरिकांशी संबंधित नव्हते. ते काम त्यांचे स्वतःचे होते. त्यांनी अभियंता राऊत यांच्या पदाचा आणि त्यांच्यावर असलेल्या कामाच्या ताणाचा कोणताही विचार न करता अवघ्या पाच मिनिटांत फाईलवर पूर्तता करण्यास सांगितले. ही बाबच मुळात अत्यंत चुकीची आहे.
त्वरीत अटक करा, अन्यथा आंदोलन
कलाटे यांनी स्वतःच्या कामासाठी अभियंता राऊत यांना केलेली मारहाण म्हणजे मुजोरपणा आहे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काही कर्मचार्यांनी दिला. कर्मचार्यांना नगरसेवकांनी मारले की अशा घटना रागाच्या भरात घडले म्हणतात. आपण सुद्धा कर्मचार्यांना मारहाण करणार्या नगरसेवकांना रागाच्या भरात व्हरांड्यात चांगले चोपून काढले पाहिजे महापालिका कर्मचार्यावर हात उगारणार्या नगरसेवकांना मारहाण करताना कर्मचारी असा फोटो पेपरमध्ये छापून आला पाहिजे. कर्मचार्यांना मारणार्या नगरसेवकांना काहीही होत नाही, तर आपणाला काय होणार आहे. महापालिकेचे कर्मचारी खतरनाक आहेत, असा वचक नगरसेवकांच्या मनात बसला पाहिजे, महासंघ राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. यापुढे कशी आंदोलने करायची हे आता कर्मचार्यांनीच ठरवावे, असे महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले.