आता पवारविरुद्ध मुंडे नाही; मुंडेविरुद्ध मुंडेच झुंजणार!

0

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका राज्यस्तरीय मेळाव्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा व्यक्त केल्याने, आणि त्यासाठी वंजारी समाजासह बहुजन समाजाने साथ देण्याचे आवाहन केल्याने हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. खास करून राज्यातील 60 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वंजारी समाजात या मुद्द्याची चर्चा सुरु झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे हा समाज भावी मुख्यमंत्री म्हणून पाहात होता. जेव्हा राज्यात भाजपची सत्ता येण्याची चिन्हे दिसून लागली, तेव्हा हे स्वप्न नक्कीच साकार होईल असे वाटले होते. परंतु, मुंडेसाहेबांच्या गूढ हत्येनंतर केवळ वंजारी समाजाचीच नव्हे तर बहुजन समाजाची मोठी भ्रमनिराशा झाली. त्यांच्यानंतर हे स्वप्न पंकजा मुंडे-पालवे यांच्या रुपाने तरी साकार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, भाजपातील राजकीय चाणक्यांनी पंकजांना अत्यंत धूर्तपणे खड्यासारखे बाजूला सारले आणि त्यांच्याकडून असलेली अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडून ती अपेक्षा समाजाला आहे.

समाजाची हीच भावना धनंजय यांनादेखील माहित असल्याने समाजाने साथ दिली तर मुख्यमंत्रिपदांचे स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करू, असे आश्वासन ते बहुजन समाजाला देऊ शकले. धनंजय यांची लोकप्रियता राज्यात अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःच्या कठोर मेहनतीने त्यांनी हे स्थान निर्माण केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांच्या सभांना सर्वाधिक मागणी होती. आणि, राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही प्रमुख ठिकाणी त्यांच्याच सभा द्याव्या लागल्यात, याचाच अर्थ पक्षात धनंजय यांना सर्वाधिक पसंती असून, अजित पवार किंवा इतर कुणापेक्षाही त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावलेला आहे. तीन वर्षापूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर केवळ वंजारी समाजच नव्हे तर अनेक छोटे-मोठे जातसमूह हादरले होते. कारण, गोपीनाथरावांचे नेतृत्व हे या जातसमूहांसाठी आधारवड होते. स्व. मुंडेंचा वारसा कोण चालविणार? असा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा आपसूकच पंकजा मुंडे-पालवे यांचे नाव पुढे आले. तर त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी स्व. मुंडेसाहेबांना राजकीय विरोध केल्यामुळे त्यांना एकाएकीच खलनायक ठरविले गेले. केवळ राजकीयच नव्हे तर कुटुंबाच्या पातळीवरदेखील त्यांच्यापासून दुरावा बाळगला गेला. एक मोठा गटच त्यासाठी सक्रीय झाला होता. ऐन दुःखाच्या काळात कौटुंबीक आणि राजकीय एकाकीपणाला धनंजय यांना सामोरे जावे लागले. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी 1994-95मध्ये संघर्ष यात्रा काढली होती. त्याच धर्तीवर संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय पंकजा यांनी घेतला. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली. पंकजांच्या रुपात भावी मुख्यमंत्री पाहणार्या सर्वच समाजाच्या आग्रहाखातर ही संघर्ष यात्रा संपूर्ण राज्यात निघणार होती. परंतु, भाजपच्या चाणक्यांनी ही मराठवाड्यापुरती मर्यादित केली. पंकजांचे पंख छाटण्याचे काम तेथूनच सुरु झाले. पक्षबाह्य आणि पक्षांतर्गत विरोधकांना शह देत, पंकजांनी 29 ऑगस्ट 2014 रोजी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थान सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेला सुरुवात केली. 21 जिल्हे आणि तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून या संघर्ष यात्रेने 44 आमदार भाजपला मिळवून दिले. ज्या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्राबल्य होते, तेथे पंकजांमुळे भाजपचे उमेदवार विजयी झालेत.

पंकजांचा राजकीय दबदबा वाढला खरा; परंतु अतिशय चतुराईने त्यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर लोटण्यात आले. ग्रामविकास व महिला, बालकल्याण खात्यावर त्यांची बोळवण झाली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्याची संधी समाजाने पंकजांना दिली होती. परंतु, राजकीय खेळीने ती मूर्तरुप धारण करू शकली नाही. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, अलिकडच्या काळात पंकजांचा जनाधार किती? हे तपासावे लागेल. त्यांच्याच बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत त्यांच्या कार्यकर्त्यांचे, भाजप उमेदवाराचे पराभव झाले. ‘नो सीएम, नो पीएम ओन्ली डीएम’चा या जिल्ह्यात घुमणारा नारा हा आगामी राजकीय बदलाचे पूर्वसंकेत आहेत. 2009 मध्ये पंकजा यांनी सर्वप्रथम परळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तर त्यांचे बंधू धनंजय हे त्यांच्याविरोधात उभे होते. या निवडणुकीत धनंजय पडलेे. सलग दुसर्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पंकजा करतात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल त्यांच्याविरोधात जातात, याचा अर्थ काय घ्यायचा? परळी पंचायत समितीच्या बारापैकी आठ जागा धनंजय गटाने जिंकल्यात. जिल्हा परिषदेच्या दहापैकी आठ जागा जिंकल्यात, तसेच, नगरपालिकेतही आपली ताकद सिद्ध केली. कौटुंबीक, राजकीय पातळीवर कडवट विरोध; घर आणि समाजात खलनायक म्हणून सिद्ध करण्यासाठी खटाटोप करूनदेखील धनंजय मुंडे यांची गेल्या पाच वर्षात वाढलेली लोकप्रियता, राजकीय ताकद ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. त्यासाठी आम्ही धनंजय यांचे खास अभिनंदन करतो. जो समाज कालपर्यंत धनंजय यांना अस्पृश्य समजत होता. आज तोच समाज त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहात आहे. त्यांचे नेतृत्व मान्य करत आहे. किंबहुना, धनजंय यांनी स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबांचे मुख्यमंत्रिपदाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, अशी हाक त्यांना देत आहे.

भारतीय जनता पक्ष, त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे. राज्याचे नेतृत्व म्हणून पुढे करावे, असा एकही चेहरा राष्ट्रवादीकडे उरलेला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी असल्याने त्यांनी स्वतःच धनंजय मुंडे यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न चालविला त्यामागे भविष्यातील पक्षाची रणनीती हेच प्रमुख कारण आहे. बेताल वक्तव्ये आणि सिंचन घोटाळ्याचे आरोप यामुळे अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाऊ शकत नाही. यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत नेत्यांच्या सभा घेण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अजितदादांपेक्षा धनंजय मुंडेंच्या सभा द्या, असा घोषा लावला होता. याचाच अर्थ धनंजय यांना ग्रामीण भागासह शहरी भागातून नेता म्हणून मान्यता लाभली असून, पुढील निवडणूक लढायची असेल अन् जिंकायचीही असेल तर धनंजय यांच्याशिवाय पवारांपुढे पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्व मानणारा पक्ष आहे. या पक्षात नेते उदंड असून, प्रत्येकाचा हात कोणत्या ना कोणत्या आरोपाच्या वरवंट्याखाली अडकलेला आहे. छगन भुजबळसारखे नेते तर तुरुंगात जाऊन बसलेले आहेत. आणखी काही नेते तुरुंगाच्या वाटेवर असल्याची खुलेआम धमकी सत्ताधारी भाजपचे नेते हे देतच असतात. दुसरीकडे, काँग्रेसची मरगळ तर सर्वपरिचितच आहे. या पक्षाला अद्यापही ऊर्जितावस्था आणता आली नाही. या पक्षाकडेही नेतृत्वाची मोठी वाणवा आहे. लोकांपुढे करण्यासारखा एकही चेहरा काँग्रेसकडे नाही. आजची राजकीय परिस्थितीच अशी आहे, की धनंजय मुंडेंसह बहुजन समाजाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यामुळेच वंजारी समाजच नव्हे तर छोट्या मोठ्या जातसमूहानेदेखील त्यांना अनुकूल कौल दर्शविण्यास सुरुवात केली आहे. बार्शी येथे झालेल्या राज्यस्तरीय मेळावा व चिंतन बैठकीतून हीच बाब प्रामुख्याने अधोरेखित झाली. अगदी हाता-तोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तोंडातून हिरावून घेतला गेला. त्याची भळभळती जखम राज्यातील 60 लाखांपेक्षा जास्त वंजारी समाजाच्या उरी आजही ताजी आहे. लोकसंख्येने कमी असलेला समाज जर राज्याचे एकदा नव्हे तर दोनवेळा मुख्यमंत्रिपद काबीज करू शकतो, तर आपण का नाही? ही त्यांची जिज्ञासा त्यांना अस्वस्थ करून सोडते. अनेक भागात मराठा समाजापेक्षा वंजारी समाजाची मते जास्त आहेत. त्यामुळे धनंजय यांच्याकडे आलेले समाजाचे नेतृत्व पाहाता, वारंवार हुलकावणी देणारे मुख्यमंत्रिपद पुढील विधानसभा निवडणुकीत तरी हुकणार नाही, असे बहुसंख्य असलेल्या या समाजाला वाटते आहे.

पवारविरुद्ध मुंडे ते मुंडेविरुद्ध मुंडे!
1994-1995मध्ये गोपीनाथ मुंडेविरुद्ध शरद पवार असा राजकीय सामना रंगला होता. या सामन्याचे दुष्परिणाम म्हणजे आजही मराठवाडा, विदर्भातील अनेक गावांत मराठाविरुद्ध वंजारी असा उभा संघर्ष पहावयास मिळतो. 1995च्या निवडणूक रणधुमाळीत राज्यात सत्ता मिळवायचीच यासाठी स्व. मुंडेसाहेब पेटून उठले होते. त्यांना मुख्य आव्हान पवारांचेच होते. परंतु, पवारांना आव्हान देणे तसे सोपे नव्हते. तरीही ते मुंडेंनी स्वीकारले. राजकारणातले गुन्हेगारीकरण हा मुद्दा त्यांनी उचलला. गुन्हेगार आणि राजकारणी यांच्यातील अभद्र युतीवर त्यांनी अक्षरशः तोफ डागली. पवारांवर दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचे घणाघाती आरोप केलेत. नागपुरात झालेले गोवारी प्रकरण असो, की जळगावातील सेक्स स्कॅण्डल. शेतकरीवर्गाचे प्रश्न असो की, बेरोजगारी, कुपोषणाचे प्रश्न असोत, मुंडेंनी सत्ताधारी काँग्रेसला आणि त्यातही शरद पवारांना जेरीस आणले. त्यामुळेच पवारांच्या नेतृत्वातील काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत मुंडेसाहेबांनी 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणली. या सत्तेत मुंडेसाहेबांच्या संघर्ष यात्रेचा वाटा मोठा होता. 2014 मध्येदेखील पंकजा मुंडे-पालवेंच्या संघर्ष यात्रेमुळेच राज्यात भाजपची सत्ता येऊ शकली. परंतु, जे 1995मध्ये झाले तेच 2014 मध्ये झाले. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. तसेच, पंकजाही मुख्यमंत्री होऊ शकल्या नाहीत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचे सद्भाग्य भाजपअंतर्गतच्या जातीय राजकारणामुळे त्यांना लाभू शकले नाही. नजीकच्या काळातही त्या मुख्यमंत्री होण्याची दुरापास्त शक्यता नाही. त्याचमुळे स्वप्नपूर्तीसाठी वंजारीच नव्हे तर राज्यातील बहुजन समाज धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाकडे झुकू लागला आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची धनंजय मुंडे यांची महत्वांकांक्षा होती. परंतु, गोपीनाथरावांनी परळीची गादी पुतणे धनंजय यांच्याऐवजी मुलगी पंकजा यांच्याकडे सोपविली. त्यामुळे अगदीच नाईलाजाने धनंजय यांना बंडाचा झेंडा फडकावा लागला. परळीचे नगराध्यक्षपद कुणाला सोपवावे यावरूनही काका-पुतण्यात मतभेद झाले. हे मतभेद टोकाचे होते तरी एकमेकांशी अबोला नव्हता. रक्ताचे नाते दुरावलेले नव्हते. तथापि, राजकीय वादाला घरगुती वादात रुपांतरित करण्याचे काम काहींनी हेतुपुरस्सर केले. आणि, काका-पुतणे वेगळे झाल्याचे चित्र सर्वांना दिसून आले. सत्य शेवटी सत्यच असते. सत्याची जाणिव समाजाला झाल्यानंतर समाजाने धनंजय मुंडेंच्या पाठिशी राजकीय ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला. बार्शीतील राज्यव्यापी मेळावा हा त्याचेच प्रतिक होता!

– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, ‘जनशक्ति’, पुणे आवृत्ती
8087861982