पुणे : हेल्मेट सक्तीच्या कारवाई विरोधात अनेक पुणेकर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धडक बसून पादचारी ही मेला, आता पादचार्यांनाही सक्तीने हेल्मेट घाला’ अशा मजकुराचा फलक गळ्यामध्ये घालून बाळासाहेब रुणवाल हे फिरत आहेत. रुणवाल दुचाकीवरून जाताना किंवा चालत असतानाही हेल्मेट घालून प्रवास करीत आहेत. त्यामुळे येणार्या-जाणार्यांचे ते लक्ष वेधून घेत आहेत.
रुणवाल म्हणाले, दुचाकी चालविताना प्रत्येक नागरिकांनी हेल्मेट घातले पाहिजे, अशी सक्ती पोलिसांकडून केली जात आहे. हेल्मेट न घातलेले कोणी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करणे ही चुकीची बाब आहे. ज्यांना हेल्मेट घालायचे असेल त्यांनी घालावे. मात्र सक्ती करता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली. मागील दोन दिवसांपासून मी देखील हेल्मेट घालत आहे. पण हेल्मेट सक्तीच्या विरोधात घालत असून नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत हेल्मेट सक्ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.