आता पार्किंगचे नवे धोरण

0

पुणे । शहरातील खासगी वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. परिणामी रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरात ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ धोरण राबविले जाणार आहे. या धोरणाचे सादरीकरण शुक्रवारी महापालिकेतील पक्षनेत्यांपुढे करण्यात आले. या धोरणानुसार, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी पुणेकरांना प्रती तास तब्बल 30 रूपये मोजावे लागणार असल्याचे या नमूद करण्यात आले आहे. या सादरीकरणासाठी विरोधी पक्षांचे गटनेते थांबले नसल्याने या योजनेसाठी सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या आयटीडीपी या कंपनीने भाजप पदाधिकार्‍यांना हे सादरीकरण केले आहे. दरम्यान, हे केवळ सादरीकरण असून त्याबाबतचा निर्णय चर्चा करूनच घेतला जाणार असल्याचे भाजप पदाधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चर्चेनंतर घेणार निर्णय
या योजनेचे हे फक्त सादरीकरण असल्याचे महापालिकेतील भाजप पदाधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले. या सादरीकरणासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांना थांबण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, ते वेळेच्या अडचणीमुळे थांबू शकलेले नाहीत. त्यामुळे आम्ही हे सादरीकरण पाहिलेले असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे या पदाधिकार्‍याने स्पष्ट केले. तसेच संपूर्ण शहरात ही योजना राबविता काही प्रमुख रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या असून हे करतानाच नागरिकांना पर्यायी पार्किंगही उपलब्ध होईल का याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याचे या पदाधिकार्‍याने स्पष्ट केले.

रस्त्यांचे विभाजन
नागरिकांना बंधन घालणे शक्य नसल्याने आता थेट रस्त्यांच्या बाजूला असलेल्या जागेवर पार्किंगसाठी भरमसाठ शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, पालिकेकडून पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेस या पूर्वीही विरोध झालेला असताना प्रशासनाकडून पुन्हा नव्याने त्यासाठीची योजना तयार करण्यात आली आहे. त्यात अती वर्दळ, मध्यम वर्दळ तसेच कमी वर्दळ असे रस्त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रत्येक भागातील रस्त्यासाठी पार्किंग शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. या झालेल्या सादरीकरणानुसार, जास्तीत जास्त प्रती तास 30 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. त्यात शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता अशा प्रमुख रस्त्यांचा समावेश असणार आहे.

रस्ते पडतात अपुरे
शहरातील खासगी वाहनांची संख्या 33 लाखांच्या वर गेलेली आहे. त्यातच शहरातील रस्ते अरूंद असले तरी त्यावरील अतिक्रमणे तसेच अर्धवट रुंदीकरणामुळे हे रस्ते वाहनांसाठी अपूरे पडत आहेत. त्यातच शहरात महापालिकेने विकास आराखडयात प्रस्तावित केलेल्या पार्किंगच्या जागा पालिकेस ताब्यात घेता येत नसल्याने रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणात पार्किंग होते. त्यामुळे संपूर्ण शहरात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून शहरात प्रमुख रस्त्यांवर येणार्‍या वाहनांनाच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.