आता पुन्हा ‘पुणे’ होणे नाही!

0

बंगळुरु: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगणार आहे. मात्र आता पुणे होणे नाही, अशीच भूमिका टीम इंडियाने बाळगली असून कर्णधार विराट कोहलीने देखील असे संकेत दिले आहेत. पुण्याच्या मैदानात सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. काही दिवसांपूर्वी लयात असणाऱ्या भारतीय संघाचा पुण्यातील पराभव हा जिव्हारी लागणारा होता. या पराभवामुळे भारताच्या विजयाची मदार फक्त कोहलीच्या नॉनस्टॉप खेळीवर असावी, असा प्रश्न देखील चाहत्यांच्या डोक्यात घोळायला लागला आहे. दोन्ही संघातील खेळाडू विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार असले तरी, खेळाडूंशिवाय या सामन्यात खेळपट्टी काय रंग दाखविणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान ही कसोटी जिंकून वापसी करण्याचा टीम इंडियाचा इरादा असेल तर कांगारू देखील पहिल्या विजयाचा आत्मविश्वास घेऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील.

इच्छाशक्तीचा अभाव पुन्हा दिसणार नाही: विराट
चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यास उद्यापासून (शनिवार) बंगळूर येथे प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला खूप काही शिकवले आहे. पुण्यामधील सामन्यासारखी खराब कामगिरी व इच्छाशक्तीचा अभाव पुन्हा दिसणार नाही, असे आश्‍वासन भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहे. आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. कसोटी सामन्यात झालेल्या पराभवावर बोलताना कोहली बोलला की, ‘अशा प्रकारच्या पराभवाला तुम्ही नक्कीच विसरणे पसंद कराल. जेव्हा एखादा निकाल आपल्याबाजूने नसतो, तेव्हा झालेला पराभव तुमच्या जिव्हारी लागणे फार महत्वाचे असते. त्या पराभवातून तुम्ही शिकणे महत्वाचे असते. जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुम्ही कधीच काही शिकू शकणार नाही’. ‘आपल्या कमतरतेमुळे आपला पराभव झाला हे मान्य करणं महत्वाचं असतं. विरोधी संघ आपल्यापेक्षा चांगला खेळला हे मान्य करणंही तितकंच महत्वाचे आहे’, असेही विराट कोहलीने सांगितले.

मालिकेत पुनरागमन करणे भारतासाठी अवघड
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 333 धावांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन वर्षातील हा अत्यंत खराब खेळ होता हे स्वत: कोहलीने मान्य केले होते. पहिला सामना हरल्याने भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणे भारतासाठी सोपी गोष्ट नाही, कारण 1932 मध्ये कसोटी खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यत फक्त तीन वेळाच भारतीय संघ पहिला सामना हरल्यानंतर मालिकेत यशस्वी कामगिरी करण्यास यशस्वी झाला आहे. स्टिव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ हा आत्तापर्यंत भारतात आलेला सर्वांत दुबळा ऑस्ट्रेलियन संघ असल्याचे मत मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आले होते. मात्र पहिल्याच सामन्यात भारतास मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ही कसोटी मालिका आता अधिक चुरशीने खेळली जाणार असल्याचे निश्‍चित आहे.

संघ झोकात पुनरागमन करेल: राजकुमार
ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाला विराट कोहली मोठ्या हिमतीने सामोरा जाईल आणि यशस्वी देखील होईल, असा विश्वास कोहलीच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केला. कोहलीला आव्हानांवर मात करणं खूप आवडतं, हेच त्याचं प्रेम आहे आणि अशावेळीच त्याच्याकडून चांगली कामगिरी होते. त्यामुळे बंगळुरू कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करेल असा विश्वास आहे, असे राजकुमार शर्मा म्हणाले. पुण्यातील पराभवानंतर माझं विराटशी बोलणं झालेलं नाही. आयुष्यात चढ-उतार येत राहतात तुम्ही त्यावर कशा पद्धतीने मात करता हे महत्त्वाचे असते. एखाद्या अपयशामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कोहली लढवय्या आहे आणि त्याला आव्हानांना सामोरे जायला आवडते. दुसरी कसोटी नक्कीच महत्त्वाची आहे आणि मला विश्वास आहे. केवळ कोहलीच नाही, तर संपूर्ण संघ यावेळी झोकात पुनरागमन करेल, असेही राजकुमार पुढे म्हणाले.

रहाणेला वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही!
करुण नायरने इंग्लंडविरुद्ध कसोटीत विक्रमी त्रिशतक ठोकले असले तरीही गेल्या दोन वर्षांपासून भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीतील कणा असलेल्या अजिंक्य रहाणेला अंतिम संघातून वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले आहे. ‘गेल्या काही वर्षांत अजिंक्यने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. संघाच्या संतुलनाचा विचार केल्यास अजिंक्यची आम्हाला गरज आहे. त्यामुळे आम्ही कधीही यावर चर्चादेखील केली नसल्याचे कुंबळे यांनी दुसर्‍या कसोटीच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले. कुंबळे यांच्या मते हा पराभव आता इतिहास झाला असून आम्ही भविष्याचा विचार करतो. आम्ही जे ठरवले त्याप्रमाणे घडले नाही, इतकेच मला वाटते. जे घडले ते घडले त्यावर विचार करून काहीच साध्य होणार नाही. ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली आणि आम्ही कमी पडलो इतकेच मी याबाबत सांगू शकेन, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘डीआरएस’बाबत चिंता नाही

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने घेतलेल्या ‘डीआरएस’बाबत बरीच चर्चा झाली. यासंदर्भात अनेकदा अंदाज साफ चुकला. कुंबळे यांनी याबाबतही टीमला पाठिंबा दिला आहे. ‘गेल्या दोन मालिकांचा विचार केला, तर ‘डीआरएस’चा वापर आम्ही प्रतिस्पर्धी संघापेक्षा चांगला केला. त्यामुळे एका कसोटीत काही अंदाज चुकले तर लगेच त्यावर टीका करण्यात अर्थ नाही. भारतीय संघाला ‘डीआरएस’चा वापर योग्यपणे करता येत नाही, असे आताच म्हणणे घाईचे ठरेल, असेही कुंबळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांपासून आम्ही खेळत असून क्रिकेटपासून काही काळ दूर राहून नव्याने तयारी करण्यासठी पुण्यात असताना ट्रेकिंग केले, असेही त्यांनी स्पष्ट केले. ताम्हिणी घाटमाथ्यावर टीम इंडियाने केलेल्या ट्रेकिंगची चांगलीच चर्चा झाली.