आता पेट्रोल पंप मालकांवर गदा

0

नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाची वक्रदृष्टी आता पेट्रोल पंप मालकांकडे वळली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे व्यवहार संशयास्पद असल्याने आता आयकर विभागाकडून पेट्रोल आणि सीएनजी पंप मालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल, सीएनजी पंपांचे मालक तसेच स्वयंपाकाच्या गॅसचे वितरक आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

लवकरच होणार कारवाई
अर्थव्यवस्थेतील गैरकारभार शोधून काढून कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणांच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. सध्या तपास सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये दोषी पेट्रोल पंप चालकांवर आणि गॅस वितरकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राप्तीकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

विक्रीत अचानक झालेली वाढ संशयास्पद
नोटाबंदीनंतरच्या कालावधीत देशातील 5 हजार पेट्रोल पंप चालकांनी त्यांच्या याआधीच्या सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त रक्कम बँकांमध्ये जमा केली. ही सर्वच्या सर्व रक्कम रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरच्या कालावधीत देशातील अनेक पेट्रोल पंपांच्या विक्रीत अचानक वाढ झाली. त्यामुळे यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय प्राप्तीकर विभागाला आहे.

परवाना होऊ शकतो रद्द
पेट्रोल पंप मालकांनी केलेल्या व्यवहाराच्या चौकशीतून घोटाळा समोर आल्यास संबंधित पेट्रोल पंपांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, अशी माहिती प्राप्तीकर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. नोटाबंदीनंतरच्या कालावधीत अनेक पेट्रोल पंपांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यात आली. या रकमेचे प्रमाण मागील महिन्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अचानक नोटाबंदीनंतर पेट्रोल पंपांवरील विक्रीत कशी वाढ झाली आहे, याची चौकशी करण्यात येईल. यामध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.