पिंपरी-चिंचवड : चर्होली, मोशी, चिंचवड, पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे अशी विविध विकासकामे पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी वास्तुविशारद, सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामासाठीही आता सल्लागार नेमण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिका ’क’ क्षेत्रीय हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनमधील देहू-आळंदी मुख्य रस्त्यालगतचे, वडाचा मळा परिसरातील तसेच मोशीतील बो-हाडेवाडी, बनकरवस्ती येथील ताब्यात आलेले विकास आरखड्यातील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. या कामाकरिता निविदापूर्व आणि निविदापश्चात कामांसाठी सचिन आपटे असोसिएट्स यांची वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
नकाशे, अंदाजपत्रक, परवानग्यांची कामे
प्रभाग क्रमांक 11 पूर्णानगर येथील सेक्टर क्रमांक 18 सीडीसी येथील मोकळी जागा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महापालिकेस हस्तांतरीत झाली आहे. प्रभागातील नागरिकांना विविध नागरी सुविधा देण्याकरिता आणि शहर सुशोभिकरणाच्या दृष्टीने ही मोकळी जागा विकसित करणे आवश्यक आहे. या ठिकाणचे नकाशे, अंदाजपत्रके तयार करण्यासाठी आणि आवश्यक परवानग्या घेण्यासाठी महापालिका पॅनलवरील वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. वास्तुविशारद शिल्पी आर्कीटेक्ट अॅण्ड प्लॅनर्स हे काम करण्यास तयार आहेत. त्यांना पाच कोटीपर्यंतच्या कामाकरिता निविदापूर्व 0.75 टक्के आणि निविदापश्चात कामासाठी 1.25 टक्के असे एकूण दोन टक्के आणि 5 ते 20 कोटीपर्यंतच्या कामासाठी अनुक्रमे 0.75 आणि 1 टक्के असे 1.75 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.
रस्ते करणार अद्ययावत
प्रभाग क्रमांक सहा मोशी – आळंदी रस्ता, गायरान रस्ता, कुदळेवस्ती येथून आळंदी रस्त्यापर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून अश्युअर्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांची महापालिका पॅनेलवर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 31 नवी सांगवी, पिंपळेगुरव भागात विनायकनगर, कवडेनगर रस्त्याकडेने पेव्हींग ब्लॉक्स बसवून रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे.
नवी सांगवीत विशेष दुरस्ती
नवी सांगवीतील रस्त्याची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच इतर रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत. या कामांसाठी इन्फीनिटी कन्सल्टींग इंजिनिअर्स आणि पेव्हटेक कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. पिंपळे-गुरव, नवी सांगवीतील ही सर्व कामे तातडीची असल्याने स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत आणि जलनि:सारण विभागामार्फत एकत्रित करण्यात येणार आहेत.