नवी दिल्ली । जगभरात आतापर्यंत शेकडो मुलांचा जीव घेणार्या व भारतातही दहशत निर्माण करणारा ‘ब्ल्यू व्हेल’ हा ऑनलाइन गेम आता खुद्द पोलीसच खेळणार आहेत. हा गेम खेळणारा आत्महत्येसाठी का प्रवृत्त होतो? गेमचा अॅडमिन त्याला नेमका कसा जाळ्यात अडकवतो?; याचा तपास करण्यासाठी ‘ब्ल्यू व्हेल’चं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे.
तपासासाठी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली जाणार
’ब्ल्यू व्हेल’ गेममुळं मुंबईत एका मुलानं आत्महत्या केल्याचा संशय आहे. तर, काही ठिकाणी या गेमच्या वेडापायी मुलांनी घरं सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सावध झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तज्ज्ञांची टीम हा खेळ खेळणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
अॅडमिनचा शोध घेणार
गेमचा अॅडमिन कुठल्या टप्प्यावर काय सूचना देतो, नेमक्या कुठल्या टप्प्यावर गेम खेळणारा त्याच्या जाळ्यात अडकतो, याचा शोध पोलीस घेणार आहेत. दिल्लीचे पोलीस उपायुक्त एनेश राय म्हणाले, ’दिल्लीत अजून तरी ’ब्ल्यू व्हेल’मुळं कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. तरीही आम्ही खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे. या गेमपायी कुणाचा जीव जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. पालकांना या गेमचे धोके पटवून सांगणं हाही यामागचा एक उद्देश आहे.’