आता प्रभाग समिती सभांना पदाधिकारी, आयुक्तांची हजेरी

0

प्रभागातील समस्या घेणार जाणून

पिंपरी-चिंचवड : प्रभागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्थापत्य विभागाशी प्रलंबित कामे वेळेत आणि जलदगतीने मार्गी लागावीत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन उपक्रम सुरु केला आहे. पदाधिकारी आणि आयुक्त प्रभाग समितीच्या सभेला उपस्थित राहून प्रभागातील समस्या जाणून घेत आहेत. तसेच ते प्रश्‍न जागेवरच सोडविण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अ आणि ह क्षेत्रिय कार्यालयाची बैठक घेण्यात आली. बैठकीत पदाधिकारी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत व प्रभागातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

या बैठकीत पाणीपुरवठा, जलनि:सारण, विद्युत पोल व एलईडी दिवे, अनधिकृत बांधकामे व नळ जोडणी, स्वच्छता, आरोग्य, घंटा गाडी, पाणी टँकर, भटकी कुत्री, हॉकर्स व हॉकर्सझोन, फुटपाथ व त्यावर लावण्यात येणारे ब्लॉक, महापौर निवास, वृक्ष गणना, पशु दफनभूमी, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज चोकप, साठलेला कचरा, राडारोडा, भिकारी निवारा केंद्र, मोकळ्या जागेवर होणारे अतिक्रमण, आदी विषयांवर चर्चा झाली.

’अ’ प्रभागातील बैठकीला उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, ’अ’ प्रभागाचे अध्यक्ष केशव घोळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक राजू मिसाळ, जावेद शेख, अमित गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, क्षेत्रिय अधिकारी आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, विशाल कांबळे, देवाण्णा गट्टूवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे यासह प्रभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.