आता फुटपाथ तसेच पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या चेंबरमध्ये सच्छिद्र ब्लॉक

0

पुणे । शहरात गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्याने तसेच दररोज नव्याने भर पडणार्‍या बेसुमार बांधकामांमुळे शहरात पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे शहरातील भूजल पाणी घटत असून भविष्यात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आता महापालिकेने याला पर्याय म्हणून रस्त्यावर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांबरोबरच आता फुटपाथ तसेच पावसचे पाणी वाहून नेणार्‍या पावसाळी नाल्यांच्या चेंबरमध्ये सच्छिद्र ब्लॉक (पोरस ब्लॉक) बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

पेव्हींग ब्लॉकचा प्रकार असलेल्या या ब्लॉकला सूक्ष्म छिद्र असल्याने त्यावरून वाहणारे पाणी हे जमिनीत मुरते. प्रायोगिक तत्वावर हे ब्लॉक तळजाई पठारावर बसविण्यात आले असून त्यांची स्ट्रेन्थ तपासण्यासाठी हे ब्लॉक आयआयटी मुंबईला तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. हा तपासणी अहवाल प्राप्त होताच शहरात यापुढे हे ब्लॉक वापरले जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. सध्या वापरल्या जाणार्‍या पेव्हींग ब्लॉकच्या किंमती एवढीच या ब्लॉकची किंमत असून ते पर्यावरणास पूरक आहेत. त्यामुळे त्याचा वापर अधिकाधिक करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

असा आहे सच्छिद्र ब्लॉक
सच्छिद्र ब्लॉक हा सच्छिद्र ब्लॉक असतो. त्यावर शेकडो लहान छिद्रे असतात, त्यामुळे त्यावर पाणी साठले अथवा पावसाचे पाणी वाहू लागल्यास या छिद्रांमधून हे पाणी जमीनीत जाते. त्याची रचना ही पाणी जमीनीत मुरून जास्तीत जास्त भार सहन करण्यासाठीच करण्यात आलेली आहे. हे ब्लॉक पदपथ, पावसाळी पाणी वाहून नेणारी गली तसेच उद्यानांमध्ये तयार करण्यात येणार्‍या पेव्हींग ब्लॉकच्या ट्रॅकसाठी उपयुक्त आहेत.

ब्लॉकची स्ट्रेन्थ तपासणे आवश्यक
तळजाई पठारावर प्रायोगिक तत्वावर हे ब्लॉक बसविण्यात आले असून त्यांचा चांगला परिणाम मागील पावसाळयात दिसून आला असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, शहरातील पदपथांवर वर्दळ जास्त असल्याने या ब्लॉकची स्ट्रेन्थ तपासणे आवश्यक असून त्यासाठी ते आयआयटी मुंबईला पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल पुढील आठवडयाभरात मिळणे अपेक्षीत असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

जलपुनर्भरणासाठी उपाय
रस्त्यांवरील पावसाचे पाणी जागा मिळेल तिकडे वांहत सुटते. मोठा पाऊस झाल्यास शहरातील प्रमुख रस्त्यांवर दोन ते तीन फूटांपेक्षा अधिक पाणी साठते. यापूर्वी हे रस्ते डांबराचे होते. तर रस्ता आणि फुटपाथमध्ये सुमारे 1 फूट जागा रिकामी सोडली जात होती. त्यातून पाणी जमिनीत मुरते. मात्र, आता शहरभर पावसाळी जलवाहीन्या टाकल्याने यामध्ये रस्त्यावरून जाणारे पाणी पावसाळी गटारापर्यंत नेऊन नंतर नदीत सोडले जाते. त्यामुळे जलपुनर्भरण होत नाही. याशिवाय, शहरात सर्वच फुटपाथवर पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येत असून ते ठोस सिमेंटचे असल्याने त्यातूनही जमिनीत पाणी जात नसल्याचे चित्र आहे. तसेच या ठोस ब्लॉकमुळे फुटपाथवरील झाडांच्या खोडांचा गळा आवळला जात असून झाडे पडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून जलपुनर्भरणासाठी ठोस उपाय शोधला जात होता.