आता बँक, एटीएममधून काढा कितीही पैसे

0

नवी दिल्ली : 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने बँक खात्यातून व एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. सुरुवातीला 2000 आणि त्यानंतर 4000 रुपये दिवसाला काढता येतील, असा नियम केला होता. तसेच एका आठवड्यात बँकेतून 24 हजार रुपये काढता येतील, असाही नियम लागू केला होता. त्यानंतर हळूहळू पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात आली. मात्र, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध सोमवारपासून उठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना बँक खात्यातून पूर्वीप्रमाणेच कितीही पैसे काढता येणार आहेत.

गेल्या महिन्य आरबीआयने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करून दिवसाला 10 हजार रुपये काढण्याची सूट दिली होती. मात्र, आठवड्याला फक्त 24 हजार रुपयेच काढता येतील, हा नियम कायम होता. 20 फेब्रुवारीपासून बँक ग्राहकांना खात्यातून 50 हजार रूपये काढण्याची मुभा 20 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळात होती. त्यानंतर सोमवारपासून रिझर्व्ह बँकेकडून सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत व सामान्य होण्याची शक्यता आहे. आता एटीएम आणि बँकेतून ग्राहकांना कितीही पैसे काढता येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यातच यासंदर्भातील घोषणा केली होती. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात आले होते. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या चलनटंचाईमुळे देशभरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. रिझर्व्ह बँकेने चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 1 फेब्रुवारीपासूनच मागे घेतल्याने व्यापारी, उद्योजकांना दिलासा मिळाला होता. पण बचत खात्याची मर्यादा कायम असल्यामुळे सर्वसामान्यांसमोरील अडचणी कायम होत्या. आता हे सर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत.