नवी दिल्ली : जुन्या नोटा बँकेत भरण्याच्या मुदतीला काही दिवस शिल्लक असतानाच केंद्र सरकारने धक्का देत नवीन घोषणा केली आहे. यानुसार जुन्या चलनातील नोटा कितीही असल्या तरी फक्त पाच हजारापर्यंतची रक्कमच बँकेत जमा करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती स्वीकारली जाणार नाही. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 30 डिसेंबरला काही दिवस शिल्लक असतानाच केंद्र सरकारने हा धक्का देत नवीन घोषणा केली आहे. अनेक लोक करंट अकाऊंटमध्ये आपला काळा पैसा जमा करुन पांढरा करत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे.
नियम फक्त जुन्या नोटांसाठी
हा नियम फक्त जुन्या नोटांपुरता असून नव्या नोटा असतील तर तुम्ही कितीही रक्कम खात्यात जमा करु शकता. पण जर तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर फक्त पाच हजार रुपये स्विकारले जाणार आहेत. पाच हजारापेक्षा जास्त रक्कम असल्यास अपवादात्मक स्थितीत ती रक्कम स्वीकारण्यात येईल. मात्र आतापर्यंत जुन्या नोटा का भरु शकला नाहीत, याचं स्पष्टीकरण दोन बँक अधिकार्यांच्या साक्षीने द्यावं लागणार आहे. इतकंच नाही तर बँकेला ग्राहकाचं उत्तर रेकॉर्डवर ठेवणं बंधनकारक राहील. यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पैसे जमा करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र करंट अकाऊंटमध्ये रोजच्या रोज जुन्या 50 हजारांचा भरणा करणार्या व्यापार्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत आरबीआय अजून काही नव्या नियमांची घोषणा करण्याची शक्यता आहे