आता बार्बी डॉलने उलगडली लैगिंक अत्याचाराची कहाणी

0

नवी दिल्ली। अल्पवयीन मुलीने चित्रातून दाखवून दिलेल्या अत्याचाराच्या प्रसंगानंतर दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने दोषी व्यक्तीला सजा सुनावल्याची घटना ताजी असताना राजधानीतच एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या सुनावणी दरम्यान बार्बी डॉलने त्या मुलीच्या वेदनेला वाचा फोडली. यावेळी या पीडित मुलीने बार्बी डॉलच्या माध्यमातून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची करुण कहाणी न्यायालयापुढे मांडली. न्यायाधीशांनी पीडित मुलीने दिलेला जबाब ग्राह्य धरून नराधमाला दोषी ठरवत त्याला पोलीस कोठडी सुनावली. या मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक करण्यात आली होती. ही घटना 2014 च्या जूलै महिन्यात दिल्लीत घडली होती. हनी नावाच्या नराधमाने पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. पीडित मुलगी तिच्या 10 वर्षाच्या भावासोबत शाळेत जात असताना नराधमाने मुलीच्या भावाला चॉकलेटसाठी पैसे देऊन त्याला दुकानाला पाठवले. यानंतर तो चिमुरडीला घेऊन दिल्लीतील नरेला या भागात गेला. तिथे मुलीवर अत्याचार करुन तिला विवस्त्रास्थेत पुन्हा घराजवळ आणून सोडले.

न्यायधिशांनी काढला तोडगा
त्या दिवशी घरी गेल्यावर त्या पीडित मुलीने या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली. या घटनेचा तिला जबर धक्का बसला होता व ती वडिलांसोबतही घरात एकटी थांबत नसे. सत्र न्यायालयात सुनावणीवेळी चिमुरडी वकिलांचे प्रश्न ऐकून घाबरायची. यावर न्यायाधीशांनी तोडगा काढून तिच्या हातात बार्बी डॉल दिली होती. सुनावणीदरम्यान तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून नेमके काय अत्याचार झाले होते हे सांगितले होते. नराधमाने कुठे स्पर्श केला असा प्रश्न विचारल्यावर तिने बार्बी डॉलच्या माध्यमातून उत्तर द्यायची. सत्र न्यायालयाने या आधारे नराधमाला
दोषी ठरवत त्याला शिक्षाही सुनावली होती.

उच्च न्यायालयाने दावा फेटाळला
कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने दिल्ली उच्च न्यायलयात धाव घेतली होती. पीडित मुलगी बचाव पक्षाच्या वकिलांच्या प्रश्नांना नीट उत्तर देऊ शकत नव्हती असे आरोपीचे म्हणणे होते. दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी झाली.उच्च न्यायलयाने आरोपीचा दावा फेटाळून लावला. वकिलांच्या प्रश्नांनी मुलगी घाबरत होती. पण बार्बी डॉलच्या माध्यमातून काय अत्याचार झाले हे निदर्शनास आणून दिले होते, असे उच्च न्यायलयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने नराधमाच्या तुरुंगावासाची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल दिला.