आता भाजपचे शहराध्यक्ष कोणत्या पक्षात जाणार?

0

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा टोला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्‍न सुटला नसल्याचे कारण पुढे करत 2014 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन अपक्ष आमदार आणि आताच्या भाजपच्या विद्यमान शहराध्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी भाजपने अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगून त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आली तरी हे प्रलंबित प्रश्‍न सुटले नाहीत. त्यातच निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आता भाजपचे शहराध्यक्ष कोणत्या पक्षात जाणार याची आम्ही वाट पाहत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच हा प्रश्‍न सुटल्याचे सांगत नेत्याने एवढी साखर वाटली की पाकिस्तानातून साखर आयात करावी लागली, असा टोलाही त्यांनी लगाविला. भाजपच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत आले. परंतु, अद्यापदेखील शहरातील प्रश्‍न तसेच प्रलंबित आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

आता कोणत्या पक्षात जाणार?
यावरून शितोळे म्हणाले की, अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा भाजपच्या शहराध्यक्षांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी दिला होता. तो राजीनामा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंजूर देखील केला होता. त्यानंतर भाजपने शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे आपण भाजपात प्रवेश केल्याचे शहराध्यक्षांनी सांगितले होते. आता भाजपची सत्ता येऊन चार वर्ष पूर्ण होत आले तरीदेखील शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष आता कोणत्या पक्षात जाणार याची आम्ही वाट पाहत आहोत. मनसेत जातात की आरपीआयमध्ये हे पाहावे लागणार आहे’’

जनेतेसाठी आमदारकी सोडली
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सोडविण्यात आघाडी सरकाराला अपयश आले असल्याचे सांगत निवडणुकीच्या सहा महिने अगोदर राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार असलेले लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. शहरातील जनेतेसाठी आपण आमदारकी सोडली असल्याचेही त्यावेळी त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्ष, मनसेच्या पाठिंब्यावर मावळ लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. परंतु, त्यात त्यांना अपयश आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन चिंचवड मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढविली. भाजपच्या चिन्हावर ते मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले होते.

मुख्यमंत्र्यांच्या वल्गना
शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सुटला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केवळ वल्गना केल्या. परंतु, प्रश्‍न सुटला नाही. अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न सोडविल्याचे सांगत या शहराध्यक्षांनी शहरभर फलक लावले. कित्येकदा साखर वाटून जल्लोष साजरा केला. साखर एवढी वाटली की देशातील साखर संपली. त्यामुळे पाकिस्तानातून साखर आयात करण्याची वेळ भारतावर आली, असा उपरोधिक टोलाही शितोळे यांनी लगाविला.