मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा १५ दिवसानंतर देखील सुटलेला नाही. दरम्यान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यानी माध्यमांशी चर्चा केली. सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील राजकीय स्थितीची माहिती राज्यपालांना दिली. त्यानंतर आता पुढे काय करायचे हे भाजपचे नेतृत्व ठरविणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेविषयी बोलणे टाळले.
महाराष्ट्रातील जनतेने युतीला सत्ता स्थापनेसाठी जनादेश दिला आहे. लवकरात लवकर महायुतीची सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावी अशी इच्छा जनतेची आहे. मात्र अद्याप यातील तोडगा निघालेला नसून लवकरच तोडगा निघून सरकार स्थापन होईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मला स्वत:हून युती तोडायची नाही
दरम्यान आजच गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली आहे. दरम्यान बैठकीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला स्वत:हून युती तोडायची नाही, परंतु जे ठरले आहे त्याप्रमाणे व्हावे, त्यापलीकडे मला काहीही अपेक्षा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल यावर शिवसेना ठाम असून आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत तोच सूर उमटला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला असून यावर आता भाजपने शब्द फिरविला आहे. मात्र जे ठरले आहे तसे व्हावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना आमदारांची हॉटेल रंगशारदामध्ये रवानगी
शिवसेना आमदारांची बैठक संपली असून आता सर्व आमदारांची मुंबईतील हॉटेल रंगशारदामध्ये रवानगी करण्यात आली आहे. आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आमदार फुटण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदा येथे दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे.