नवी दिल्ली : इस्त्रायलने विकसित केलेली शीघ्र प्रतिक्रिया तंत्र (क्युआरटी) ही प्रणाली भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एकीकृत सीमा व्यवस्थापन योजनेंतर्गत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांचा जागीच खात्मा करणारी क्युआरटी प्रणाली आणण्याचे ठरवले आहे. सीमा सुरक्षा दल ६ हजार ३०० किलो मीटरहून जास्त सीमांचे रक्षण करीत आहे. बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा यांनी संसदीय समितीने या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिल्याचे सांगितले.
काय आहे क्युआरटी…
सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे सीमेवर लावले जातील. त्याला मॉनिटर जोडलेले आहेत. २४ तास या मॉनिटरवर सीमा सुरक्षा सैनिकांचे लक्ष असेल. यात एक सॉफ्टवेअर आहे जे सीमेवर कोणाताही बदल झाला तरी सर्व कॅमेरे अंधारातसुद्धा हालचाली टीपतील. त्यानंतर लगेच एक आलार्म होऊन संपूर्ण माहिती ही प्रणाली देईल.
पायलट प्रोजेक्ट सुरू….
सीमा सुरक्षा दल जम्मुमध्ये पाच पाच किलोमीटरवर दोन क्युआरटी योजना राबवित आहे. त्यानंतर ही योजना पंजाब, गुजरात, पश्चिम बंगाल आणि आसाममधील चार सीमांवर राबवून नंतर सर्वत्र हे सीमा संरक्षण तंत्रज्ञान तैनात केले जाईल.
दिवसरात्र गस्त नको….
तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटर लांब सीमांवर जवानांना गस्त घालण्याची गरज नाही. शत्रुराष्ट्रांनी घेरलेला इस्त्रायल कमी मनुष्यबळ असुनही क्युआरटीचा वापर करून सुरक्षित रहातो. धोका असल्यावरच जवान चोख प्रत्युत्तर देतील.