मुंबई । मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना चिक्की देण्याचा प्रस्ताव बारगळल्यानंतर आता विद्यार्थ्यांना भाजलेले चणे, शेंगदाणे तसेच मनुका आणि खारिक अशा मिक्स खाऊचे पाकीट देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पोषक आहाराबरोबरच पूरक आहार वितरण योजनेंतर्गत चिक्की देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. परंतु, चिक्कीसाठी 3 ते 4 वेळा निविदा काढूनही एकही पुरवठादार पुढे न आल्यामुळे अखेर चिक्कीचा विचार मागे पडला.
आता या चिक्कीला पर्याय म्हणून चणे, शेंगदाणे यासह मनुका व खारिक अशाप्रकारचा खाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीला ठेवला होता. यावर मंगळवारी गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून चणे -शेंगदाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील शाळांमधील मुलांना चिक्की देण्याची मागणी होत असताना, त्यासाठी कोणताही पुरवठादार पुढे येत नव्हता. त्यामुळे या चिक्कीचा पुरवठा शहर विभागासह पूर्व व पश्चिम उपगरांसाठी विभागून देऊन कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्यालाही प्रतिसाद न लाभल्यामुळे आता चणे व शेंगदाणे पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे होणार वाटप
मिक्स खाऊ पाकीट –
(पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी ) भाजलेले चणे 5 ग्रॅम, भाजलेले शेंगदाणे 5 ग्रॅम, मनुके 5 ग्रॅम, खारिक 2 नग.
मिक्स खाऊ पाकीट –
(इयत्ता सहावीपासून) भाजलेले चणे 10 ग्रॅम, भाजलेले शेंगदाणे 10 ग्रॅम, मनुके 10 ग्रॅम, खारीक 2 नग.