जाधव, बोराटे, काटे, ढाके यांची नावे चर्चेत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे यांचा महापौर पदाचा सव्वा वर्षाचा कालावधी पुढील महिन्यात संपणार आहे. त्यामुळे नवीन महापौर पद भोसरीला मिळणार की चिंचवडला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसरीतून राहूल जाधव, वसंत बोराटे, संतोष लोंढे तर चिंचवडमधून शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. स्थायी समितीच्या निवडीपासून ते विविध विषय समितीच्या अध्यक्ष निवडीपर्यंत सर्वच वेळी पक्षांतर्गत असलेली नाराजी उफाळून आली आहे. निष्ठावंत आणि आयाराम असेही नाराजी दिसून आली आहे. त्यामुळे आता महापौर निवडीनंतर कोण राजीनामा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 11 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. या सर्व महापालिकांची निवडणूक एकत्रित झाली होती. त्यामुळे या सर्वच महापालिकांच्या महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाजपची जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत महापौरपद सव्वा वर्षांचा करण्याच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही महापौरपदावर नवीन नगरसेवकाला संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात महापौर बदलाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या महत्त्वपूर्ण असलेल्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी आमदार जगताप गटाच्या ममता गायकवाड यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे महापौर पदाचा दावा भोसरी गटाने केला आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या राहूल जाधव यांना सदस्य पद दिल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. स्थायी समिती न मिळाल्याने माळी समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला. श्रध्दा आणि सबुरीचे फळ जाधव यांना मिळेल असे सांगून त्यांना महापौर पदाची आशा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दाखविली आहे. त्यानंतर जाधव यांच्याच प्रभागातील नगरसेवक वसंत बोराटे यांनीही महापौर पदासाठी इच्छुक असल्याचे सांगून विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच संतोष लोंढे यांनीही आपण महापौर पदासाठी योग्य असल्याचे दर्शविले आहे. तर चिंचवडमधून नामदेव ढाके आणि शत्रुघ्न काटे यांचे नाव शर्यतीत आहे.
जगताप गटाचे वर्चस्व
आतापर्यंत महापालिकेत महत्त्वपूर्ण समित्यांवर आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे महापौर पदासाठी जगताप कुठली खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी स्थायी समितीचा दावा भोसरीकरांनी केल्यानंतरही हे पद चिंचवडला गेल्याने महापौर पद नक्की कुठल्या गटाकडे जाणार यासाठी उत्सुकता लागली आहे.