आता मिशन २० ट्वेंटी

0

कानपूर : टीम इंडियाने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजविल्यानंतर आता मिशन २० ट्वेंटी फतेह करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी बुधवारी कसून सराव केला. दोन मालिकेत मोठा पराभव स्वीकारणाऱ्या इंग्लंडच्या संघाला आता ट्वेंटी ट्वेंटी मालिका जिंकून इभ्रत वाचविण्याचा संघर्ष करावा लागणार आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात इंग्लंड संघाने, तर दुपारच्या सत्रात भारतीय संघाने कसून सराव केला. सामना सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार असून ८ वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फिरकीला अनुकूल ग्रीन पार्क
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) मीडिया व्यवस्थापक ए. ए. खान तालिब यांनी सांगितले, की इंग्लंड संघ सकाळी ९ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाला आणि त्यांनी १२.३० पर्यंत सराव केला. भारतीय संघाने दुपारी १ वाजल्यानंतर सरावाला सुरुवात केली. उभय संघातील सर्वच खेळाडू सराव सत्रामध्ये सहभागी झाले. सरावादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख होती. येथे खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल मिळविणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करण्यास पसंती द्यायला हवी. कारण अखेरच्या षटकांमध्ये चेंडू स्विंग होत असल्यामुळे येथे फलंदाजी करणे अडचणीचे जाते, असे मत ग्रीन पार्कचे क्युरेटर यांनी व्यक्त केले. फिरकीला अनुकूल ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर २६ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. या खेळपट्टीवर कसोटीसामन्यादरम्यान चेंडू जेवढा वळतो त्यातुलनेत टी-२० सामन्यादरम्यान चेंडू वळणार नाही, असेही क्युरेटरने म्हटले आहे.

सामना सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार असून ८ वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६० ते १७० धावांपर्यंत मजल मारायला हवी, अशी शक्यता अस्थायी क्युरेटर शिव कुमार यांनी व्यक्त केली. हिवाळा असल्यामुळे सायंकाळी ५ वाजतानंतर दव पडण्यास सुरुवात होईल. त्याचा गोलंदाजांना लाभ मिळेल. अखेरच्या षटकांमध्ये चेंडू अधिक स्विंग होण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होईल.
क्युरेटर शिव कुमार

राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळणार!
भारतीय क्रिकेट संघ २६ जानेवारी रोजी गणराज्य दिनाच्या पर्वावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान राष्ट्रध्वजाचा बॅच लावून खेळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना (यूपीसीए) याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनासोबत चर्चा करणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितले, की यूपीसीएतर्फे राष्ट्रध्वजाचे बॅच खेळाडूंसाठी उपलब्ध करून देणार आहे.

शमीला बोलावून घेतले!
ट्वेन्टी-२० संघात समावेश नसतानाही भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संघ व्यवस्थापनाने कानपुरात बोलावून घेतले आहे. दुखापतीतून सावरत असलेल्या मोहम्मद शमीच्या सुधारणांवर जवळून लक्ष ठेवता यावे आणि त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीचा रितसर सराव देखील करून घेता यावा यासाठी शमीला कानपुरात भारतीय संघाच्या सराव शिबीरात सामील होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही शमी कानपुरच्या सराव शिबीरात सामील होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीचा संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून शमीचे संघात पुनरागमन व्हावे यासाठी संघ व्यवस्थापनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. शमीच्या घरच्या मैदानात सरावासाठी अपेक्षित सोयीसुविधा नसल्याने त्याला कानपूरमध्ये बोलावून घेण्यात आले आहे.