शक्तीप्रदर्शनासह मंदिराचा शिलान्यास करणार
नवी दिल्ली । अमेरिका, चीन, जपाननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आता आखाती देशांकडे लक्ष वळाले आहे. आखाती देशांना मोदी भेट देत असून, 11 फेब्रुवारीरोजी विक्रमी संख्येने उपस्थित राहणार्या भारतीयांना मोदी साद घालताना प्रथमच दिसतील. फेब्रुवारी 9 ते 12 या दरम्यान हा दौरा असून मस्कत, ओमान इथे ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.
भाषण ऐकण्यासाठी खूपच उत्सुकता
ओमानमध्ये मोदींविषयी प्रचंड कुतूहल असून मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोदींचे अनिवासी भारतीयांच्या सभेत भाषण ठेवण्यात आले आहे. ओमानमधले हे सगळ्यात भव्य स्टेडियम आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी येथे खूपच उत्सुकता आहे असे ओमानच्या सरकारी अधिकार्यांनी म्हटले. जगभरातल्या भारतीयांशी संवाद साधण्यासाठी मोदी नेहमीच तत्पर असतात, आणि ते जगभरातल्या भारतीयांना देशाचे राष्ट्रदूत किंवा एकप्रकारे अॅम्बेसिडर असेच संबोधतात असे एका सरकारी अधिकार्याने सांगितले.
दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदीर
अबू धाबीमध्ये पहिले मंदीर बांधण्यात येणार असून या मंदिराच्या शिलापूजन समारंभ बघायला मिळणार आहे. पश्चिम आशियातील हा दौरा मोदींसाठी या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये केवळ दुबईमध्ये हिंदूंचे एकमेव मंदिर आहे. मोदींनी 2015 मध्ये अमिरातीला भेट दिली होती, त्यावेळी हिंदूंच्या मंदिरासाठी जागा देण्याची घोषणा संयुक्त अरब अमिराती सरकारने केली होती.
अमिरातीमध्ये 26 लाख भारतीय
मंदिरासाठी 20 हजार चौरस मीटरची जागा अल वथबा येथे देण्यात आली आहे. मंदिराच्या बांधकामाचा खर्च खासगी निधीतून करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 26 लाख भारतीय असून तेथील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के भारतीय आहेत.