पल्लेकेले । भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील श्रीलंकेच्या अडचणींचा पाढा वाढतोच आहे. लंकेचा प्रमुख गोलंदाज रंगना हेरथ कंबरदुखीमुळे भारताविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. याआधी गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार दिनेश चंडिमल न्युमोनिया झाल्यामुळे खेळू शकला नव्हता. अष्टपैलू असेला गुणरत्नेही याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्यामुळे या सामन्यातल्या दोन्ही डावांमध्ये गुणरत्ने फलंदाजीला आला नव्हता. चंडिमल दुसर्या कसोटीत संघात परतला असला तरी गुणरत्नेला मात्र पूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली. हेरथ दुसर्या कसोटीत खेळला होता. हेरथच्या गैरहजेरीत डावखुरा फिरकी गोलंदाज मलिंदा पुष्पकुमारावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल.
रुमेश गोलंदाजीचा मार्गदर्शक
माजी वेगवान गोलंदाज रुमेश रत्नायकेकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा गोलंदाजीचा मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 53 वर्षीय रत्नायके संघाता चंपका रामानायके यांची जागा घेतील. श्रीलंका क्रिकेटने अधिकृरित्या घोषणा केली. रत्नायकेने 1985-86 मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेतील एका सामन्यात नऊ विकेट्स मिळवल्या होत्या. त्या मालिकेत रत्नायकेने 20 विकेट्स मिळवल्या होत्या. श्रीलंकेच्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन केले.