आता राजकीय नेत्यांची बेकायदा बांधकामे मनपाच्या रडारवर

0

मुंबई । घाटकोपर इंडस्ट्रीयल रोडवरील 2 गाळे, तर महिंद्रा पार्क येथील 2 आणि हिंगवाला लेन येथील 2 गाळ्यांवर शनिवारी तोडक कारवाई करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून पालिकेने सुरू केलेला अनधिकृत बांधकामविरोधातील कारवाईचा धडाका आता राजकारण्यांच्या अनधिकृत बांधकामांच्या दिशेने वळवला असल्याचे चित्र आहे. घाटकोपर येथे गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे झपाट्याने वाढली आहेत. जुलै महिन्यात घाटकोपर एलबीएस रॉड येथील सिद्धी साई इमारत कोसळली होती. यानंतर या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सुनील शितप याची अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडारवर आली होती. यादरम्यान, येथील अन्य राजकारण्यांचीही अनधिकृत बांधकामे असल्याचे पालिकेच्या शोधकार्यात समोर आली होती. त्यादृष्टीने अशी बांधकामे तोडण्याबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे.

विद्यमान नगरसेवकांची बांधकामे रडारवर
नुकतेच पालिकेने घाटकोपर इंडस्ट्रियल रोडवरील अमृत नगर चौक येथे सुमारे 125 अनधिकृत दुकाने तसेच गाळे महापालिकेच्या एन विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तोडले. यात एका विद्यमान नगरसेवकाचे दोन गाळे असल्याचे समजते. पालिकेची धडक कारवाई अधिक तीव्र होणार असल्याने येथील अनधिकृत बांधकामे करणार्‍या राजकारण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहेत.

125 अनधिकृत बांधका+मांवर हातोडा
अनधिकृत बांधकामांपैकी शितपच्या एका बांधकामाबाबत कागदोपत्री पुरावे पूर्णपणे तपासले जात आहेत. घाटकोपर इंडस्ट्रियल इस्टेट मार्गावर एकूण 125 अनधिकृत बांधकामे निश्‍चित करण्यात आली आहेत. ही सर्व बांधकामे राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची आहेत. यातील अनेक बांधकामांबाबत न्यायालयीन प्रकरणे होती. त्यातील काही निकालात निघाली आहेत. काही रद्द झाली आहेत. त्यामुळे या सर्व अनधिकृत गाळ्यांवर सोमवारी कारवाई करण्यात येणार असल्याचे एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.