आता राज्यभर प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिम

0

पुणे । क्षयरोग ही भारतातील मोठी आरोग्य समस्या आहे. क्षयरोगग्रस्त रुग्ण नियमित तपासणी करत नसल्याने राज्य क्षयरोग विभागाकडून आता प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिम राबविली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हे व महापालिकांमध्ये तीन टप्प्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामांवरील मजूर अड्डे, कामगार वस्त्या, तुरुंग, निर्वासित रात्रशाळा, फुटपाथवरील मुले, कारागृहातील कैदी, निराधार असलेली घरे, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे.

क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच समाजामध्ये क्षयरोगाबद्दल जनजागृती होऊन क्षयरोगाचे निदान लवकर होण्यास मदत होणाण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमे संर्दभातील सर्व मार्गदर्शन सूचना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग सुधारीत कार्यक्रम यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्यास पाठविण्यात आल्या आहेत. पहिला टप्पा 16 ते 30 जानेवारी दरम्यान झाला. दुसरा टप्पा 17 ते 30 जुलै तर तिसरा टप्पा 4 ते 18 डिसेंबरला होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र डीन
या मोहिमेची सुरुवात पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व ठाण्यापासून होणार आहे. या मोहिमेसाठी शहर व जिल्हास्तरावर स्वतंत्र डीन नेमण्यात आले असून, त्यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच शहर क्षयरोग अधिकारी यांच्या नियंत्रणात विविध विभांगाचे कर्मचारी असणार आहेत. तसेच असे रुग्ण जवळच्या क्षयरोग निदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यासाठी सर्वसाधारण आरोग्य सेवा विभाग व आशा मधील कर्मचार्‍यांचीही मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेचा दैनंदिन तपशिल संबंधित आरोग्य अधिकारीकडे असणार आहे. तीन टप्पांत प्रत्यक्ष किती रुग्ण सापडतात यासंबंधीत संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे.

15 टक्के नमुने दूषित
1 लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे 5 हजार संशयित व त्यामधून 250 थुंकीदुषीत क्षयरुग्ण निघणे अपेक्षित आहे. आरोग्य संस्थेमध्ये संशयितांचे गुणवत्तापूर्ण थुंंकी नमुने प्रयोगशाळेत तपासल्यास सरासरी 10 ते 15 टक्के नमुने दूषित आढळतात. प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेत अपेक्षित 5 टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षित आहे. रुग्णाचे सर्व तपशिल दोन आठवड्यात एकत्र करून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर एकत्र केला जाणार आहे, अशी माहिती क्षयरोग व कुष्ठरोग विभागाचे सह संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

सुपरस्टार बच्चन करतात जनजागृती
प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहिमेबाबत सुपस्टार अमिताभ बच्चन जनजागृती करताना दिसत आहेत. टीबी फ्री इंडिया कँपेन अंर्तगत सरकारी आरोग्य कर्मचारी तुम्हाला टीबीशी संबंधित माहिती घरी येऊन देतील, सहकार्य करा व देशाला टीबीपासून मुक्त करा, असा संदेश ते जाहीरातीच्या माध्यमातून देत आहेत.