आता रेल्वे तिकिटासाठी बँकेकडे चला!

0

मुंबई : नोटाबंदी करून बँकांपुढे संपुर्ण देशाला रांगेत उभे करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आता बँकांमधूनच रेल्वेची तिकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे खिडक्यांसमोरची गर्दी कमी करण्यासाठी प्रदीर्घ चिंतन करून रेल्वे मंत्रालयाने हा अभिनव प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बँकांमध्ये खातेदारांच्या सोबतच रेल्वेचे तिकीट खरेदी करण्यासाठीही मोठी रांग लागणार आहे. एप्रिल 2017 पासून स्टेट बँक ऑफ इंडियामधून रेल्वेच्या तिकिटांची विक्री प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल, असे संकेत रेल्वे बोर्डाने दिले आहेत.

व्हेंडिंग मशीन, एटीएमद्वारेही तिकीट विक्रीचा विचार
स्टेट बँकेच्या एटीएममध्ये काही बदल करून तिथूनच रेल्वेच्या तिकिटांची विक्री केली जाईल अथवा स्वतंत्र व्हेंडिंग मशिनद्वारे तिकिटांची विक्री केली जाईल. या संदर्भातला अंतिम निर्णय लवकरच घेऊ अशी माहिती रेल्वे बोर्डाने दिली. अनेक ठिकाणी तर बस स्टँड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणांवरुन रेल्वे तिकीट विक्री आधीच सुरू करण्यात आली आहे. आता बँकेतून तिकिटांची विक्री सुरू झाल्यास रेल्वे खिडक्यांसमोरची गर्दी कमी होईल, असा विश्वास रेल्वे बोर्डाने व्यक्त केला आहे. एप्रिल 2017 पर्यंत ही योजना सुरू होईल असा अंदाज असून त्यानंतर ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. या नव्या उपक्रमासाठी बँक दोन पर्यायांचा विचार करत आहे. एकतर बँकेच्या परिसरात व्हेंडिंग मशीन बसवण्यात यावी, जिथून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होऊ शकते. तर दुसरा पर्याय म्हणजे एटीएममध्ये काही बदल करून त्याला रेल्वे तिकीट वाटप यंत्रणेशी जोडणे. यामुळे रेल्वे तिकीट मिळणे खूप सोपे होईल असे रेल्वेचे म्हणणे आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटरवर येणारा भार कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.