आता वाजले की बारा..!

0

रोमन राजा ज्यूलियस सिझर याने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी काय असेल तर ती म्हणजे आपण सध्या वापरत असणारे इंग्रजी कँलेंडर आणि इंग्रजी महिने. सुमारे 400 वर्षांपूर्वी जगभरातल्या बहुतांशी देशांनी हे कँलेंडर मान्य केले आहे. यानुसार न्यू इयर सेलिब्रेशन हे गेल्या काही वर्षातील जगभरातल्या सामान्यातल्या सामान्य नागरीकांपासुन ते उच्चवर्गिय, श्रीमंत वा गरीबांकडून साजरा केला जाणारा सर्वांत मोठा खर्चिक सण, इव्हेंट ठरला आहे. कित्येक कोटींची उलाढाल आणि आतशबाजीचा वर्षाव करणार्‍या या इव्हेंटमध्येही प्रत्येक देशाने आपली अशी एक खासियत जपली आहे. आता वाजले की बाराच्या जल्लोषात साजरे होणार्‍या या उत्सवामागे अनेक रंजक श्रद्धाही आहेत.

जॉर्जियन अथवा रोमन राजा न्यूमा पोम्पीलीयस यांच्या दरबारात इ.स.पूर्व 700 वर्षापूर्वी दरबारात अथवा राज्यात कोणत्याही नव्या कामाची सुरूवात 1 जानेवारीपासुन केली जायची. याच कालावधीत इतर देशांमध्ये 1 मार्च, 25 मार्च, 1 सप्टेंबर आणि 25 डिसेंबर हे दिवस महत्वाचे मानले जात असत. 1 जानेवारीपासुन नव वर्षाची सुरूवात करायची आणि संपुर्ण वर्ष 12 महिन्यात विभागायचे. याकरीता रोमन राजा ज्युलियस सिझर याने रोमन कँलेडरची सुरूवात केली. त्याच्या सन्मानार्थ त्याच्या जन्मतारखेचा महिना जो पूर्वी रोमन कँलेंडरनुसार क्वाईन डिलीयस असा होता, त्याचे नाव बदलून तो ज्यूलियस असा करण्यात आला. पुढे तो जुलै या नावाने रूढ झाला. काही वर्षानंतर ऑगस्टस या ज्युलियसच्या नातवाने लीप इयरचा शोध आणि दर तीन वर्षांनतर येणार्‍या चौथ्या वर्षातील एक अथवा दोन दिवसाचा फरक अशा गोष्टी सर्वप्रथम शोधून काढल्या होत्या, म्हणून सेक्साटिलीयस या आठव्या महिन्याचे नामकरण ऑगस्टस असे करण्यात आले. नंतर हे नाव ऑगस्ट असे रूढ झाले.

31 डिसेंबर हा सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि 1 जानेवारी ही नव्या वर्षाची सुरूवात असे मानणार्‍या आणि थर्टी फर्स्टच्या रात्री जोरदार जल्लोष करणार्‍या विविध देशांच्या अनेक मजेशीर गंमती जमती आहेत.

स्पेन- स्पेनमध्ये नव्या वर्षाचे स्वागत द्राक्षे खाउन केले जाते. जेव्हा 31 डिसेंबरच्या रात्री 12 चे टोल सुरू होतात तेव्हा प्रत्येक नागरीक एक एक द्राक्ष आपल्या तोंडात टाकतो असे एकुण 12 द्राक्षे खाल्ली जातात. या प्रथेमागील श्रद्धेनुसार 12 टोल आणि 12 द्राक्षे हे नव्या वर्षाच्या 12 महिन्याचे प्रतिक मानले आहे, कदाचित एखाद्याच्या धांदरटपणामुळे एखादे द्राक्ष कमी खाल्ले गेले तर ते ज्या नंबरचे असेल त्या नंबरचा महिना संबधितांना काहीसा वाईट परिणाम देणारा असू शकतो, अशी इथल्या नागरिकांमध्ये गाढ श्रद्धा आहे. दक्षिण अमेरिका – या देशांतील नागरीक अनोख्या पद्धतीने कुटुंबासोबत घरीच नववर्षाचे स्वागत करतात, या रात्री घरातील सर्व सदस्य एकत्र येवून एका काठीवर टांगलेल्या कावळ्याची प्रतिकृती तयार करतात, प्रत्येक सदस्य सरत्या वर्षात केलेल्या चुका, फसवणूक यांची यादी नावांसह तयार करतो. हा कागद कावळ्याच्या अंगाभेवती चिकटवला जातो, बाराचे टोल सुरू झाले की या कावळ्याची प्रतिकृती ते टोल संपण्याच्या आत जाळण्याची आणि नव्या वर्षाचे स्वागत नव्या उमेदिने करण्याची प्रथा इथे मोठ्या उत्साहात निभावली जाते. 12 चे टोल संपल्यानंतर ज्या सदस्याचे कागद अर्धवट जळालेले अथवा अजिबात न जळालेले आढळतात त्या सदस्यास नव्या वर्षात आपत्तीचा सामना करावा लागणार, असे मानले जाते. ज्यू – जगभरात विखलरेले ज्यू सप्टेंबरमध्ये रोश शहनाह या दिवशी नववर्षाचे स्वागत करतात, मधात बुडवलेले सफरचंद खाणे हा या दिवसाचा पवित्र पदार्थ समजला जातो. चीन -चीनमध्ये 17 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत नववर्षाचे स्वागत केले जाते. नव वर्षाचे स्वगत एका भल्या मोठ्या ड्रॅगनच्या प्रतिकृतींच्या मिरवणूकीने केले जाते. तत्पूर्वी नागरीक रस्त्यावर उतरून हजारो कंदिल पेटवतात आणि रस्ता कंदिलाच्या प्रकाशाने उजळून टाकतात. त्यांच्या श्रद्धेनुसार ठिकठिकाणीची वाईट शक्ती या प्रकाशाने पळून जाते. यानंतर हे लोक आपापल्या घरी जावून दारे, खिडक्या पेपरच्या मदतीने पॅक करतात आणि दारासमोर, रस्त्यावर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करतात. स्कॉटलँड – या देशांत थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीपासुन ते 1 जानेवारीच्या, मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणच्या रस्त्यावर पेटलेल्या पत्र्याचे, डाबराचे बॅरेल, टायर आढळतात या पेटलेल्या बॅरलप्रमाणे जुने वर्ष चुका, वाईट गोष्टी अनिष्ठ प्रथा प्रवृत्तीही नाश पावतात, असा इथल्या नागरीकांचा समज आहे. ग्रीस – ग्रीसमध्ये संत बसीलच्या नावे हा दिवस साजरा केला जातो. या रात्री पेटलेल्या शेकोटीच्या भोवती लहान मुलांना आपापले शूज काढून ठेवायला सांगतात, जेणेकरून संत बसील हे शूज भरून गीफ्ट आशिर्वाद देईल, अशी येथे श्रद्धा आहे. जपान – आपले घर संपूर्णपणे बांबू, हिरव्या पानांच्या सहाय्याने सजवून जापनीज नागरीक नवीन वर्षाचे स्वागत करतात, फ्रान्स-1 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत फ्रान्समध्ये नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. पॅन केक, बदक आणि हंसाचे फ्लेवरड मांस आणि सोबत शँपन, हॉट वाईन असा या दिवसाचा खास मेन्यू असतो. या लोकांच्या समजूतीनुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जितके स्वादिष्ट जेवण करता, अन्न खाता तितकेच तुमचे वर्षही दर्जेदार आणि स्वादिष्ट ठरते. खिस्ती धर्मानुसार 1 जानेवारी हा येशूच्या नामकरणाचा दिवस मानला जातो. म्हणूनच येशूच्या जन्मापासुन ते त्याच्या नामकरण सोहळ्यार्पंत हे सेलिब्रेशन साजरे केले जाते. काही देशांत तर 1 जानेवारी हा नॅशनल हॉलिडे साहीर करण्यात आला आहे. दरवर्षी सिडनीमध्ये एक ते दीड लाख प्रकारच्या आतशबाजी फटाक्यांची रेलचेल डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरते. एकूणच काय तर, पाश्‍चिमात्य देशांच्या लाईफस्टाईलचा सार्वत्रिक आणि सर्वदूर परिणाम सर्वच देशांवर होवू लागल्याने थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशनही त्यांच्याच स्टाईलने चिअर्स केल्याशिवाय पूर्ण होतच नाही, कारण कोणतेही असो, जब मिल बैठेंगे चार यार हा मूड कायम असतो, इथे तर नववर्षाचे स्वागत हा जागतिक इव्हेंट आहे, नोटांबदीच्या तंगीतही यंदा, आता वाजले की बारा असे म्हणत, एक घुुंट मुझे भी पिलो दे …चा नारा सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतातही रंगणार एवढे नक्की.

संवाद- योगिनी बाबर
9960097266