विद्यार्थ्यांच्या खात्यावरच मिळणार शिष्यवृत्ती!

0

मुंबई (निलेश झालटे) : गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र ही शिष्यवृत्ती शाळा किंवा महाविद्यालयाला दिली जात असल्याने विद्यार्थ्याला खेटे घालावे लागत असत. यावर उपाय म्हणून विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या व निर्वाहभत्त्यांची रक्कम यापुढे शाळा, महाविद्यालयांना देण्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच यासंबंधीचे आदेश काढले जातील अशी माहिती देखील सूत्रांनी दिली.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या शाळा, महाविद्यालयांना दिले जातात. ही पध्दत बंद करुन यापुढे शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाला लिंकिंग करण्यात येईल व शिष्यवृत्तीचे पैसे आधार कार्डाशी जोडण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आपल्या हक्काचे पैसे असून देखील विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार शाळा, महाविद्यालयांकडून केले जात होते. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे वापरले जाण्याचे प्रकार होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणार्‍या सर्व शिष्यवृत्ती, निर्वाहभत्ता आदींसाठी हीच पध्दत अवलंबण्यात येणार आहे. लवकरच यासंबंधी शासन निर्णय होण्याची शक्यता आहे. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. अनेकदा बोगस विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावर शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीची रक्कम लाटण्याचा प्रकार घडतो अशा तक्रारी होत होत्या. मात्र नवीन नियमामुळे या प्रकारांना आळा बसेल व असे प्रकारांवर देखील अंकुश येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः शाळा, महाविद्यालयात पैसे भरू शकणार आहे. बोगस विद्यार्थ्यांवर आळा घालण्यासाठी विभागाने शिष्यवृत्तीसाठीचे नियम कडक केले आहेत. विद्यार्थ्यांना आधार कार्डची माहिती अर्जासोबत जोडावी लागणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांच्या नावावर बोगस अर्ज करुन शिष्यवृत्ती लाटण्याचे प्रकार पूर्णतः बंद होणार आहेत.