पुणे : न्यूझीलंड, इंग्लंड यांच्यानंतर बांगलादेशला धूळ चारत निर्विवाद वर्चस्व गाजवीत असलेल्या विराटसेनेची गाठ आता बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज पुण्याच्या गहुंजे मैदानाला सामना जिंकून गिफ्ट देण्याची तयारी टीम इंडियाने केली आहे. निरंतर सामने जिंकत आलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून तगड्या संघासह मैदानात उतरलेली विराटसेना ऑस्ट्रेलियाला देखील पाणी पाजण्यास कसून मेहनत करत आहे. तर मागच्या मालिकेतील दयनीय पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ देखील आतुर असून दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे कुठलाही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचे सांगत विराट कोहलीने आपला इरादा स्पष्ट केला असून स्मिथ व ऑस्ट्रेलियाच्या टीमने टीम इंडियाविरुद्धची रणनीती दोन महिन्या आधीपासूनच सुरु केली आहे. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी पुणेकर आणि सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.
आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज
मागील भारत दौऱ्यात कांगारूंचा ०-४ ने सुपडा साफ झाला होता. अलीकडे भारतीय संघाने न्यूझीलंड आणि इंग्लंडवर मालिका विजय नोंदविले. कोहलीच्या नेतृत्वाखाली आता आॅस्ट्रेलियावरही मालिका विजय मिळविण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. भारतीय संघ कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले. खेळपट्टी वा वातावरणामुळे चिंतीत न होता आपल्या कामगिरीवर विश्वास असणारा संघ तयार करण्याला आमचे प्राधान्य आहे. अर्थात ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. अलीकडे भारतीय संघाने मैदान तसेच मैदानाबाहेरच्या आव्हानांचा समर्थपणे सामना केलाय. नव्या दमाच्या या संघाच्या प्रगतीतील सातत्य प्रशिक्षक म्हणून समाधान देणारे आहे. कुठलाही दबाव न ठेवता खेळाडू आपला नैसर्गिक खेळ करू शकेल, असे वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे नमूद करून यात यशस्वी ठरल्याबद्दल कुंबळे यांनी आनंद व्यक्त केला.
अतिरिक्त खेळाडूंची नवी ‘जम्बो खेळी’
भारतीय संघात १६ खेळाडू आहेत. याशिवाय काही नवोदित खेळाडूसुद्धा संघाच्या तयारीसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. सक्षम संघनिर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी जयंत यादव, कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी तयारीस हातभार लावला आहे. याशिवाय डावखुरा अनिकेत चौधरी, नथू सिंग, बसील थम्पी हेसुद्धा नेट प्रॅक्टिसमध्ये सक्रिय आहेत. याविषयी कुंबळे म्हणाले, की पूर्वी दौऱ्यावर जाताच किंवा सामन्याच्या दिवशी सकाळी खेळाडू जायबंदी होण्याचे प्रकार घडले. अशा वेळी सक्षम पर्याय असणे गरजेचे असते. भरगच्च वेळापत्रक पाहिल्यास स्थानिक क्रिकेटमधील गुणी गोलंदाज हेरण्यास पुरेसा वेळ मिळणे शक्य नाही. अशा वेळी असा संच उपयुक्त ठरतो. अंतिम संघात केवळ ११ खेळाडूंनाच संधी मिळते; पण इतर खेळाडूसुद्धा तयारीत आणि पर्यायाने यशासाठी हातभार लावू शकतात, असे कुंबळे म्हणाले.
टीम इंडियाचा दमदार फॉर्म कायम राहणार?
भारतीय संघाने आॅक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करीत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले होते. भारताने न्यूझीलंडला ३-० आणि इंग्लंडला ४-० ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने २०८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये भारतीय संघाने सलग १९ सामने जिंकले आहेत. २०१५मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीनंतर भारताचा पराभव झालेला नाही हे विशेष. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठीचा भारतीय संघ आॅस्ट्रेलिया विरुद्धदेखील कायम ठेवण्यात आला आहे. आज, २३ फेब्रुवारीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ पहिल्या कसोटीस सामोरा जाईल. विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे आणि याचा धसका आॅस्ट्रेलियानेदेखील घेतला आहे. कोहलीची विकेट घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने योजना आधीपासूनच आखण्यासदेखील सुरुवात केली होती. टीम इंडिया आपला फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियास पाणी पाजण्यासाठी तयार आहे.