श्रीनगर-जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील जिल्हा प्रशासनाने व्हॉट्स अॅपवरील ग्रुपविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अफवा आणि खोट्या बातम्यांवर लगाम लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रुप अॅडमिन्सनी दहा दिवसांत जिल्ह्यातील राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्रात (एनआयसी) नोंदणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
किश्तवाडमधील पोलीस अधीक्षक अबरार चौधरी यांनी २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक अहवाल पाठवला होता. यात जिल्ह्यात अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याचे म्हटले होते. या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी अंग्रेजसिंह राणा यांनी व्हॉट्स अॅपवरील ग्रुप अॅडमिन्सनी नोंदणी करावी, असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील व्हॉट्स अॅपवरील सर्व ग्रुप अॅडमिन्सने एनआयसीकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यांच्या ग्रुपवरील मेसेजसाठी ते स्वत: जबाबदार असतील, या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानातील अन्य कलमाअंतर्गत कारवाईचा सामना करावा लागेल, असे या आदेशात म्हटले आहे.