आता शिरपूर तालुक्यातील ‘इंच न इंच’जमीन लवकरच सिंचनाखाली येणार!

0

धुळे । तापी नदी बॅरेजेसमुळे बारमाही झाली आहे. बुराई नदीवरील 34 बंधार्‍यांमुळे बुराई नदीही बारमाही होणार आहे. तापी-प्रकाशा-बुराई, सुलवाडे-जामफळ योजना कार्यान्वित झाल्यावर शिंदखेडा तालुक्यातील इंच न इंच जमीन सिंचनाखाली येईल, असा विश्‍वास राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. रेवाडी (ता. शिंदखेडा) येथून परिक्रमेस सुरुवात झाली. वाडी (ता. शिंदखेडा) गावात ग्रामस्थांशी संवाद साधला. नारायण पाटील, जि.प. सदस्य कामराज निकम, सरपंच अनिल गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, तहसीलदार सुदाम महाजन आदी उपस्थित होते. यावेळी मोराणे येथील तरूण-तरुणींनी पथनाट्य सादर केली.

रोप लागवड, संगोपनाचे आवाहन
जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आगामी पावसाळ्यात ग्रामस्थांनी प्रत्येकी एक याप्रमाणे रोपांची लागवड करावी. तसेच त्यांचे संगोपन करावे असे आवाहन ना. रावल यांनी यावेळी केले. दरम्यान, वाडी गावाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी या महिन्यात बैठक आयोजित करून त्यांचे निरसन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, भारतीय संस्कृती नदी काठावर विकसित झाली आहे. नद्यांच्या काठाने गावे वसली आहेत. आपल्याला नद्यांचा फार मोठा आधार आहे. त्यामुळे नद्या बारमाही वाहणे आवश्यक आहे. बुराई नदी बारमाही वाहण्यासाठी बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यांचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल.

बुराई परिक्रमेत आज…
शुक्रवार, 13 रोजी सकाळी 7 वाजता आरावे गावाकडे प्रयाण, सकाळी 8 वाजता आरावे येथे आगमन व बुराई नदीवरील केटीवेअर बंधार्‍याचे भूमीपूजन, सकाळी 9.30 वाजता आरावे येथून अमराळेकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता अमराळे येथे बुराई नदीवरील केटीवेअर बंधार्‍याचे भूमीपूजन, सकाळी 11 वाजता अमराळे येथे आगमन, सभा व राखीव, सायंकाळी 5 वाजता अमराळे येथून गांगेश्‍वर मंदिराकडे प्रयाण, सायंकाळी 5.40 वाजता गांगेश्‍वर येथे आगमन व राखीव, सायंकाळी 6 वाजता गांगेश्‍वर येथून चिमठाणे, ता. शिंदखेडाकडे प्रयाण, सायंकाळी 7 वाजता चिमठाणे येथे बुराई नदीवरील केटीवेअर बंधार्‍याचे भूमीपूजन, सायंकाळी 7.30 वाजता चिमठाणे येथे बुराई नदी काठावरील संरक्षण भिंत बांधकामाचे भूमीपूजन, रात्री 8 वाजता चिमठाणे येथे जाहीर सभा व राखीव (मुक्काम).

दुष्काळी तालुक्याची ओळख पुसणार
पुढे बोलतांना ना. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका ही ओळख पुसून काढावयाची आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करून परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. सिंचन, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असे नियोजन केले आहे. तापी नदी बारमाही झाल्याने नदी काठावरील गावात बागायती क्षेत्र वाढले आहे. तापी बुराई, सुलवाडे जामफळ, उपसा सिंचन योजना, बुराई नदी माथा ते पायथा बारमाही झाल्यावर सिंचनाखालील क्षेत्र वाढेल. त्यामुळे या भागात शेतकरी केळी, ऊस यासारखे बागायती पिके घेऊ शकतील.