आता श्‍वास रोखून धरा!

0

मुंबई । भारतीय टेनिसप्रेमींसाठी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या आयोजकांकडून एक मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या दक्षिण आशियातील एकमेव अशा एटीपी 250 स्पर्धांमध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत रफाल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी सहभाग घ्यावा म्हणून स्पर्धेचे आयोजक प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. याआधी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्पर्धेत बुम बुम बोरीस बेकर, स्टॅनिस्लास वावरिंका, कार्लोस मोया, मरिन सिलीच या टेनिस जगतातील आघाडीचा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला आणि टेनिस जगतातील सर्वाधिक यशस्वी असलेल्या फेडररने सध्यातरी निवृत्ती घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मागील वर्षाच्या उत्तरार्धात पाठदुखी आणि गुडघ्याच्या दुखण्यामुळे फेडररला सक्तिची विश्रांती घ्यावी लागली होती. या दुखण्यांवर मात करत टेनिस कोर्टवर परतलेल्या फेडररने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावत सात स्पर्धा जिंकल्या. त्यात ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डंन स्पर्धेचा समावेश आहे. मेलबर्न पार्कचे कोर्ट फेडररसाठी खूप महत्वाचे आहे. पुनरागमनानंतर याच कोर्टवर फेडररने पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी रफाल नदालला पराभूत केले होते. आगामी काळात स्पर्धा कमी खेळून पूर्णपणे फिट राहायचे आणि कारकीर्द लांबवायची असाच फेडररचा प्रयत्न असेल.

चेन्नईतून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यावर महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेसाठी आघाडीच्या दिग्गज टेनिसपटूंनी प्रतिसाद दिला आहे. मरिन सिलीच, केव्हीन अँडरसन याशिवाय जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहीलेला टॉमी रॉब्रेडो हे महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या लढतींमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा काय असेल हे लक्शात येते. स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, फेडरर आणि नदाल यांचा ऑस्ट्रेलियन टेनिस संघटनेशी करार झाला आहे. फेडरर पर्थमध्ये हॉपमन स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे त्याने महाराष्ट्र ओपन स्पर्धेत खेळावे यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत.

निवृत्तीचा विचार नाही
आगाम वर्षात कठिण आव्हान असणार याची जाणिव फेडररला आहे. पुढील वर्षी दुखापतींना मागे टाकून अनेक टेनिसपटू कोर्टवर उतरण्याची शक्यता आहे. फेडरर म्हणाला की, नोवाक जोकोव्हीच,अँडी मरे, स्टॅनिस्लास वावरिंका, केई निशिकोरी, मिलॉस रॉनिक यांनी दुखापतींवर कशी मात केली याचे मला आश्‍चर्य वाटते. यांच्यातील एकाशी माझा सामना होऊ शकतो.