आता समृद्धीच्या वाटेवर

0

सध्या शेतकरी, कामगार आणि सामान्यांचा असंतोष जिथे आहे तिथे घुसण्याशिवाय विरोधी पक्षाला गत्यंतर नाही. मुंबई ते नागपूर व्हाया औरंगाबाद आणि जालना या मराठवाड्यातल्या दोन जिल्ह्यांतून जाणार्‍या समृद्धी महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे अ‍ॅग्रेसीव्ह आहेत. त्यासाठी नियमात बदल करून भरपाईची रक्कमही त्यांनी वाढवली. मात्र, आजही शेतकरी त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. हाच असंतोष गोळा करत विरोधी पक्षाला तग धरायचा आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना ओहोटी लागली आहे. पक्षाचे अस्तित्व राखणे आणि पुन्हा ते वाढवणे यासाठी दोन्ही पक्षांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे मिळेल तो विषय हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. म्हणूनच शरद पवारांनी समृद्धी महामार्ग या विषयात रस घेतला आहे. समृद्धी महामार्ग आतापर्यंत मागास राहिलेल्या भागात समृद्धी आणणारा आहे, असे सरकार ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आजवरच्या विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाचा इतिहास पाहिला, तर स्थानिकांचा विरोध कधीही मावळलेला आढळत नाही. अगदी कोकण रेल्वेचे उदाहरण घ्या. मधू दंडवते हयात असेपर्यंत कोकणी माणसांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पण त्याच कोकण रेल्वेत प्रवास करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा होत आहे.

समृद्धी महामार्गाने राज्यात आणखी एक क्रांतिकारी पाऊल पडणार आहे हे निश्‍चित आहे. मराठवाड्यात त्याचा अधिक परिणाम जाणवेल. औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांतून थेट जाणार्‍या या महामार्गाला आजूबाजूचे जिल्हे जोडण्याची योजनाही या महामार्गाच्या नियोजनात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतील मालाचे दळणवळण जलदगतीने होऊ शकेल. परिणामी, वेळ, इंधन आणि पैसाही वाचणार आहे. त्यासाठी लागणारी जमीन रेडिरेकनरच्या दरापेक्षा पाचपट अधिक दराने विकत घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. महामार्गासाठी अजून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्या आधीच हा महामार्ग वादविवादात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या महामार्गामुळे मागास मराठवाडा आणि विदर्भात समृद्धी येईल, यात शंका नाही. पण त्याचा लाभ कोणाला मिळणार हा वादाचा मुद्दा आहे. अलिबागचा आरसीएफचा प्रकल्प असो की कोयना धरणाचा वीजप्रकल्प. सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळते. नर्मदा धरणाचा आणि सागर सरोवरचा इतिहास आपल्या समोर आहेच. अर्थात, विकास कशाला म्हणायचे, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. मोठमोठ्या धरणांनी देशाची शेती उत्पादकता वाढवून देशाला अन्नधान्याबाबतीत स्वावलंबी केले. पण त्याच धरणांमुळे लाखो शेतकरी त्यांच्या जमिनीला मुकले. त्यातल्या सर्वांचेच नीट पुनर्वसन झाले, असे नाही. अनेक कुटुंबे देशोधडीलाही लागली आहेत. समृद्धी महामार्गाचेही तसेच आहे. या मार्गाने किती शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे आणि किती जणांना भूमिहीन व्हावे लागणार आहे यावर या महामार्गाकडे कसे पाहायचे हे ठरेल. त्यामुळे संबंधित यंत्रणेने केवळ या भविष्यातील समृद्धीची स्वप्ने दाखवण्याऐवजी लाभ हानीची सिद्ध झालेली आकडेवारीही प्रामाणिकपणे समोर मांडायला हवी. त्याशिवाय सरकारने दाखवलेल्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवायचा की विरोधकांनी दाखवलेल्या भीतीने गर्भगळीत व्हायचे, हे शेतकर्‍यांना समजणार नाही. परिणामी, ते आत्मसंरक्षणाच्या बाजूने जाऊन विरोधकांची छत्रछायाच स्वीकारतील, हे उघड आहे.

मुंबई-पुणे महामार्गाला पश्‍चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याने विरोध केला होता का? लवासात शेतकर्‍यांची जमीन गेली तेव्हा शरद पवारांची काय भूमिका होती? असे प्रश्‍न या महामार्गात बाधित होणार्‍यांचे आहेत. पवार तसे धुरंधर राजकीय नेते आहेत. उगाच आणि कधीही कोणत्या प्रश्‍नाला हात घालत नाहीत. त्यांना राजकारणाची नेमकी दिशा कळते. त्याचे अचूक टायमिंग त्यांना कळते. गेला महिनाभर शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू राहिलेल्या आंदोलनात ते कमीत कमी वेळा बोलले, पण अचूक बोलले. त्यांना आंदोलन आणि सरकार याच्या मर्यादा कळतात. सध्या त्यांच्या पक्षाची झालेली पडझड सावरणे हे त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे. काँग्रेसला संपवणे आणि राष्ट्रवादीचा टिकाव लावून धरणे याची कसरत त्यांनी गेली तीन वर्षांपासून अचूकपणे साधली आहे. भाजपला त्यांनी दिलेला मदतीचा हात हा त्याचाच एक भाग आहे. परंतु, नेमके कोठे थांबावे हेही त्यांना कळते. म्हणूनच आता भाजपवरचे प्रेम आटोपते घेत हळूहळू पक्षाची गाडी पूर्वपदावर आणण्याचे नियोजन ते करत आहेत. उद्या काही काळासाठी समृद्धी महामार्गाचे आंदोलन पेटलेले दिसेलही. त्यातून काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्नही होईल. मात्र, त्याचा मूळ उद्देश हा राष्ट्रवादी पक्ष बळकट करणे हा निश्‍चितच असेल. समृद्धीचा महामार्ग काँग्रेसला छेद देत देत पुढे सरकतोय की काय, याचीच चाहूल या आंदोलनातून लागते आहे.