मुंबई – राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी आता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्यात येणार आहे. या तक्रारपेट्या प्रत्येक आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात येऊन तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला.
राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आता शाळेच्या दर्शनी भागात तक्रापेटी बसविण्यात येणार आहे. या तक्रारपेटीत महिला शिक्षक, विद्यार्थिनी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करू शकतील. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे तसेच अशा तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या तक्रारी व्यवस्थापन समिती समोर ठेवण्यात येणार आहे. तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात लावून ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल असे या आदेशात म्हटले आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनी अथवा शिक्षकांनी केलेल्या तक्रारी मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात येणार आहे. संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारींसाठी पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. अशा तक्रारींचे निवारण शाळा व्यवस्थापन स्तरावर करण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे शाळेतील प्रत्येक समस्या विद्यार्थांना निर्भिडपणे मांडता येणार आहेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.