आता साखर कारखानेही रिटेल क्षेत्रात दाखल

0

दौंड येथे पहिलाच प्रयोग : किरकोळ विक्री करण्यास परवानगी

पुणे : साखरेचे कमी होणारे दर आणि त्यामुळे शेतकर्‍यांना ‘एफआरपी’ देण्यात येणार्‍या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आता साखर कारखान्यांनासुद्धा साखरेची किरकोळ विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा आरंभ दौंड येथील नाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्यापासून करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा पहिला प्रयोग असून आता साखर कारखाने रिटेल क्षेत्रात उतरणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांना 2,900 रुपये प्रतिक्विंटल या दराने साखरेची विक्री करण्यास केंद्र सरकारकडून परवानगी दिली आहे. तसेच कारखान्यांना कोटादेखील ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार साखरेचे उत्पादन झाल्यानंतर कारखान्याकडून निविदा मागवून साखरेची विक्री केली जाते. प्रत्यक्षात निविदेला प्रतिसाद मिळत नाही अथवा मिळाला तरी दर कमी मिळतो. त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ‘एफआरपी’ देणे अडचणीचे होते. एकीकडे ही परिस्थिती असताना बाजारात प्रत्यक्षात 3,500 रुपये दराने साखरेची विक्री होत. या पोर्शभूमीवर लेव्हीच्या कोट्यातील साखरेची विक्री थेट ग्राहकांना करण्यास दौंड येथील कारखान्याला परवानगी देण्यात आली आहे. या कारखान्याच्या किरकोळ विक्री केंद्राचे उद्घाटन बुधवारी होणार आहे.

32 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दर

केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या किमान आधारभूत किंमत प्रति किलो 29 रुपये 50 पैसे त्यावर जीएसटी व हाताळणी शुल्क लक्षात घेता ही साखर 32 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दराने मिळणार आहे. त्याऐवजी राज्यातील सर्व तुरुंग आणि आश्रमशाळांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी केली जाते. ती साखर थेट साखर कारखान्यातून खरेदी करण्यासंदर्भात आदेश काढावेत, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.